सानुग्रह अनुदानसाठी महापालिकेसमोर कामगार युनियनचे धरणे आंदोलन सुरू

अहमदनगर – महानगरपालिका कामगारांच्या दिवाळी सण अग्रीम, सानुग्रह अनुदान, दिवाळीपूर्वी पगार व पेन्शन, महागाई भत्ता आदी मागण्यांबाबत वेळोवेळी चर्चा व निर्णय होवूनही प्रशासनामार्फत अद्यापही कार्यवाही झाली नसल्याने कर्मचारी युनियनने धरणे आंदोलन सुरू केले आहे.

काही दिवसांपूर्वीच मनपा आयुक्तांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. प्रशासन व युनियनच्या संयुक्त बैठकीतील झालेल्या निर्णयाप्रमाणे सानुग्रह अनुदान तात्काळ अदा करण्यात यावे. कामगारांना दिवाळी सणापुर्वी ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबरचे वेतन व पेन्शन अदा करण्यात यावी. पात्र कामगारांना कालबध्द पदोन्नतीचा फरक तात्काळ अदा करण्यात यावा. महापालिकेच्या निवड समितीच्या निर्णयानुसार बढती व कालबध्द पदोन्नतीस पात्र ठरविण्यात आलेल्या 103 कर्मचार्‍यांना तात्काळ सदरच्या लाभाबाबतचे आदेश देण्यात यावेत. शासन निर्णयानुसार कामगारांना 3 टक्के महागाई भत्याच्या फरक चालू वेतनासोबतच अदा करण्यात यावा. सेवानिवृत्त कामगारांना सहाव्या वेतन आयोगाचा थकीत फरक दिवाळी सणापुर्वी अदा करण्यात यावा, अशा मागण्या युनियनने केलेल्या आहेत.

आंदोलन सुरु झाल्यानंतर अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी उपायुक्त प्रदीप पठारे यांच्याशी चर्चाही केली. प्रशासनाकडून दिवाळी अ‍ॅडव्हान्ससाठी तरतूदही करण्यात आली आहे. मात्र सानुग्रह अनुदानाबाबत काय निर्णय होतो, याकडे कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे. या धरणे आंदोलनात अध्यक्ष लोखंडे यांच्यासह आनंद राववायकर, आयुब शेख, विजय बोधे, विठ्ठल उमाप, सूर्यभान देवघडे, बलराज गायकवाड, अकिल सय्यद, पाशा पटेल यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा