अक्कल दाढ आल्याखेरीज अक्कल येत नाही का?

प्रत्येक व्यक्तीला आधी दुधाचे दात येतात व मग कायमचे दात येतात. दुधाचे दात वीस असतात. यात प्रत्येक जबड्यात चार पटाशीचे दात, दोन सुळे, तसेच चार दाढा असतात. वयाच्या ६ ते ८ महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंत हे दात येत राहतात. वयाच्या सहाव्या वर्षापासून हे दात पडायला लागतात व तेरा चौदा वर्षांपर्यंत सर्व पडून जातात.

कायमचे दात बत्तीस असतात. यात प्रत्येक जबड्यात चार पटाशीचे दात, दोन सुळे, चार उपदाढा व सहा दाढा यांचा अंतर्भाव होतो. यातील शेवटी येणार्‍या दाढांना अक्कलदाढा असे म्हणतात. वयाच्या सतराव्या वर्षांपासून नंतर केव्हाही त्या येतात. अक्कलदाढा नसतील तर मात्र वयाचा अंदाज बांधता येत नाही. १७-१८ वर्षापासून अक्कलदाढा येत असल्याने या दाढांचा अकलेशी संबंध लावला गेला असावा.

या वयापर्यंत व्यक्ती जगातील बरेचसे अनुभव घेते. शिक्षण व अनुभव या दोहोंमुळे तिला बरेवाईट काय याची जाण यायला सुरुवात होते. त्यामुळेच अक्कलदाढ आल्यास व्यक्तीला शहाणपण आले, असे समजले जात असावे. प्रत्यक्षात हे खरे नाही. कारण काही व्यक्तींना अक्कलदाढाच नसतात.

दिवसेंदिवस उत्क्रांतीच्या या टप्प्यात जबड्याचे हाड लहान होत आहे. त्यामुळे बर्‍याच जणांच्या जबड्याच्या हाडात अक्कलदाढ यायला जागाच नसते. त्यामुळे त्यांच्या अक्कलदाढा एकतर वेड्यावाकड्या येतात (त्यामुळे त्या काढून टाकाव्या लागतात) किंवा येतच नाहीत; पण त्यांना अक्कल मात्र सगळ्यांसारखीच असते. त्यामुळे अक्कलदाढेचा व अक्कल येण्याचा तसा काही संबंध नसतो!