मिस्किन मळा रस्त्यासह पूल खाली गेल्याने वाहतुकीत येताहेत अडथळे मजबुतीकरणावेळी रस्त्यासह पुलाची उंची वाढविण्याची मागणी

 (छाया- धनेश कटारिया, अहमदनगर)

अहमदनगर – सावेडी उपनगरातील तारकपूर ते मिस्किन मळा ते वसंत किर्ती पोलिस विश्रामगृह या रस्त्यावरील पुलाची मोठी दुरावस्था झाली असून, पुलाची पडझड झाली आहे. पुलाची उंची कमी आणि दोन्ही बाजूचे रस्ते वर त्याचबरोबर मिस्किन मळा रस्ता खाली गेल्याने पावसाळ्यात या ठिकाणी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.तरी सदर पुलाची आणि मिस्किन मळा रस्त्याची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. उपनगरातील तारकपूर ते मिस्किन मळा रस्ता पुलापर्यंत वर असून, वसंत किर्ती पोलिस विश्रामगृहाकडे जाणारा रस्ताही वर आहे, परंतु पूल खाली असून मिस्किन मळा रस्ताही खाली गेला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी सदर रस्त्यावर अनेक अडचणी येत आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यात या पुलावर आणि मिस्किन मळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. पावसाळ्यात या रस्त्याने जाताना नागरिकांचे मोठे हाल होतात.

सदर रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम होणार असून, हे काम करताना पुलाची दुरुस्ती करून त्याची उंची वाढवावी तसेच मिस्किन मळा रस्त्याची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. यासंदर्भात नितीन थोरात यांनी महापौर सौ. रोहिणी शेंडगे यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, तारकपूर हायवेवरून सावेडी उपनगरात येणार्‍या प्रमुख रस्त्यापैकी हा रस्ता आहे. या रस्त्यावरून अनेक शासकीय आस्थापनांकडे हा रस्ता जातो. तहसीलदार कार्यालय, सावेडी मनपा कार्यालय, तोफखाना पोलिस स्टेशन, भूमि अभिलेख मोजणी ऑफिस, लेबर कोर्ट व नव्याने उभारण्यात आलेले जिल्हाधिकारी कार्यालय तसेच शालेय विद्यार्थी व उपनगरातील नागरिक या रस्त्याने मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात. आपण व मनपा कर्मचार्‍यांना देखील अनेक वेळेस या रस्त्याने जाण्याचा योग आला असेल हे निश्चित. त्या दरम्यान आपल्याला असे लक्षात आले असेल की, मिस्किन मळा येथील ओढा ते पीरबाबा ते 100 तारकपूरच्या दिशेने पावसाळ्यात या पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचते व त्यामुळे नेहमी वाहतूक बंद होते. कारण सदरहु ठिकाणी असलेल्या पुलाची उंची कमी व पाण्याचा उतार पुलाकडे असल्याने त्या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळते.उपरोक्त बाब लक्षात घेता सदरहु पुलाच्या भाग ते तारकपूरच्या दिशेने 100 मीटर अंतरापर्यंत रस्त्याची सध्याच्या उंचीपेक्षा साधारण दोन फूट उंची वाढविणे गरजेचे आहे, त्यामुळे या भागात वॉटर लॉगिंग होणार नाही. तरी कृपया संबंधित प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नितीन थोरात यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा