हेपॅटिक हेमॅन्जिओमाविषयी…

‘हेपॅटिक हेमॅन्जिओमा’ म्हणजे यकृताच्या आतल्या भागातल्या किंवा वरच्या पृष्ठभागावरच्या रक्तावाहिन्या एकमेकांमध्ये गुंतून ट्यूमर निर्माण होणं. या ट्यूमरचं रूपांतर कॅन्सरमध्ये होत नाही. तसंच याची फारशी लक्षणंही दिसून येत नाहीत. शरीरात या विकाराचं अस्तित्त्व असल्याचं रूग्णांच्या लक्षातही येत नाही. इतर काही कारणांनी यकृताची तपासणी केली तर ‘हेपॅटिक हेमॅन्जिओमा’चं निदान होतं. ‘हेपॅटिक हेमॅन्जिओमा’ औषधोपचारांशिवायही बरा होऊ शकतो.

‘हेपॅटिक हेमॅन्जिओमा’मुळे होणार्‍या ट्यूमरचा आकार बराच लहान असतो. साधारण चार सेंटीमीटरचा ट्यूमर यामुळे विकसित होऊ शकतो. पण काही रूग्णांमध्ये ट्यूमरचा आकार वाढू शकतो. मग त्याची लक्षणंही दिसू लागतात. ओटीपोटात वेदना होणं, मळमळणं, उलटी, भूक मंदावणं अशी या विकाराची सर्वसाधारण लक्षणं आहेत. ‘हेपॅटिक हेमॅन्जिओमा’ असलेल्या रूग्णांमध्ये इतर कारणांमुळेही ही लक्षणं दिसून येतात. त्यामुळे तपासणीअंतीच या त्यामागचं मूळ कारण लक्षात येतं. गरोदर महिला तसंच ‘इस्ट्रोजेन रिप्लेसमेंट थेरपी’ घेणार्‍या महिलांमध्ये हेमॅन्जिओमाचा आकार बराच मोठा होऊ शकतो. सर्वसाधारणपणे एका वेळी एकच हेमॅन्जिओमा विकसित होतो. पण अनेक हेमॅन्जिओमा विकसित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘हेपॅटिक हेमॅन्जिओमा’मुळे प्रौढांमध्ये कोणतीही गुंतागुंत निर्माण होत नाही. पण अर्भकांसाठी हा विकार धोकादायक ठरू शकतो. लहान मुलांमधल्या हेपॅटिक हेमॅन्जिओमाला ‘इनफंटाईल हेमॅन्जिओएंडोथेलिओमा’ असं म्हटलं जातं. मूल सहा महिन्यांचं होण्याआधी या विकाराचं निदान होतं. हा लहान मुलांमधला दुर्मिळ विकार आहे. ‘हेपॅटिक हेमॅन्जिओमा’मागील नेमक्या कारणाचा शोध अद्याप लागला नसला तरी यामागे अनुवांशिक कारणं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. काही प्रकारचे हेपॅटिक हेमॅन्जिओमा जन्मजात असू शकतात. त्यामुळे कुटुंबात या विकाराचा इतिहास असेल तर त्याची तपासणी करून घ्यायाला हवी. 30 ते 50 या वयोगटातल्या लोकांना हेपॅटिक हेमॅन्जिओमा होण्याची शक्यता सर्वाधिक असते. इस्ट्रोजेन हेमॅन्जिओमाच्या विकासाला कारणीभूत ठरत असल्याने पुरूषांच्या तुलनेत महिलांना याचा धोका जास्त असतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा