आहारवेद – आहारातून आरोग्य संवर्धन काय खावे? आरोग्यदायी फळांचे महत्त्व

गाजर उपयोग – गाजर चावून खाल्ल्यामुळे तोंडामध्ये लाळ अधिक प्रमाणात सुटते व त्यामुळे घेतलेले जेवण व्यवस्थित पचते, म्हणून जेवण करण्यापूर्वी सॅलडमध्ये गाजर अवश्य खावे. अपचन, भूक मंदावणे, गॅसेस होणे, आंत्रव्रण (अल्सर), आतड्यांना सूज येणे (कोलायटीस) इ. तक्रारीवर गाजराचा रस एक कप दोन वेळा प्यावा. सहा ते सात दिवस अशाप्रकारे रस प्यायल्याने आतड्याच्या आतील श्लेष्मल त्वचेला बळकटी येऊन वरील आजार दूर होतात. बालकांना कृमी होऊन पोटदुखीचा त्रास होत असेल, तर रोज सकाळी एक कप गाजराचा रस द्यावा. यामुळे पोटातील जंत अगदी सहजपणे पडून जातात. गाजरामध्ये विपुल प्रमाणात ’अ’ जीवनसत्त्व असल्यामुळे त्याच्या सेवनाने शक्ती निर्माण होते. म्हणून लहान बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ चांगली होण्यासाठी त्यांना नियमितपणे रोज एक गाजर खायला द्यावे. लहान बालकांना दात निघताना अनेक वेळा पचनाच्या तक्रारी उद्भवतात. त्या होऊ नयेत म्हणून सकाळ-संध्याकाळ तीन ते चार चमचे गाजराचा रस पाजावा, तसेच बालकांना चघळण्यासाठी गाजर द्यावे. यामुळे हिरड्यांची सळसळ कमी होऊन दात उगवतानाचा त्रास कमी होतो व घेतलेल्या अन्नाचे गाजराच्या दीपक-पाचक गुणधर्मामुळे सहज पचन होते.

बर्‍याचशा स्त्रियांची पाळी अनियमित असते. पाळी नियमितपणे येण्यासाठी व पुढे गेलेली पाळी येण्यासाठी गाजराचे बी पाण्यात वाटून सलग पाच दिवस सकाळ-संध्याकाळ घ्यावे. गाजराचे बी हे आकाराने लहान, भुरकट रंगाचे, सुवासिक, स्तंभक, शक्तिवर्धक, मूत्राशयाचे विकार दूर करणारे व गर्भाशयाच्या वेदनांवर व विकारांवर उपयोगी आहे. गाजर वाफवून त्याचे पोटीस करून शरीरावरील बेंडावर लावल्यास बेंड फुटून जखम लवकर बरी होते. गाजरामध्ये ’अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्याचा नियमितपणे आहारात वापर करावा. शरीरावरील कोठलीही खराब जुनी जखम बरी होण्यासाठी किसलेले गाजर वाफवून त्याचे पोटीस करून लावावे. अर्धशिशीचा (मायग्रेनचा) त्रास होत असेल, तर गाजराच्या पानांचा रस काढून तो रस तीळतेलामध्ये उकळून नाकात किंवा कानात दोन-दोन थेंब टाकल्यास व त्याच तेलाने डोके व कपाळ चोळल्यास अर्धशिशी थांबते. जुलाबाचा त्रास होत असेल, तर तो थांबण्यासाठी व शरीरातील पाण्याची कमतरता भरून येण्यासाठी गाजर वाफवून त्याचे सूप करून प्यावे. मूळव्याधीतून जर रक्त पडत असेल, तर गाजराची भाजी करून खावी. यामुळे रक्त पडणे थांबते. तसेच आहारामध्ये गाजराची कोशिंबीर करून त्यात दही व डाळिंबाचे दाणे घालून खाल्ल्याने मूळव्याधीचा त्रास दूर होतो. सौंदर्य टिकविण्यासाठी गाजर नियमितपणे सेवन करावे. गाजरामुळे शरीर कांतियुक्त, कोमल, मुलायम व सुंदर बनते. चेहर्‍याचा टवटवीतपणा वाढविण्यासाठी व कांतियुक्त करण्यासाठी गाजराचा कीस चेहर्‍यावर हलक्या हाताने चोळावा. आहारामध्ये गाजर अनेक प्रकारे वापरता येते. गाजर हलवा, खीर, वड्या, भाजी, सूप, कोशिंबीर, सॅलड, केक, भात अशा अनेक प्रकारांमधून गाजराचा वापर नियमित करावा. त्यामध्ये असणार्‍या पौष्टिक घटकांमुळे शरीराला शक्ती व ऊर्जा मिळते व त्यातूनच शारीरिक व मानसिक वाढ चांगली होते.

सावधानता – गाजर हे उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे सहसा गर्भावस्थेत पहिल्या पाच महिन्यांत त्याचा वापर जास्त प्रमाणात करू नये. ’अ’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असल्यामुळे गर्भावस्थेच्या पाच महिन्यानंतर गाजराचा वापर योग्य प्रमाणात करण्यास हरकत नाही.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा