शहरात मालमत्ता कर वसुलीसाठी आता महापालिकेची जप्तीची मोहीम-आयुक्तांनी चारही प्रभाग कार्यालयांना दिले वसुली वाढविण्याचे आदेश

अहमदनगर – महापालिकेची कोट्यावधींची देणी थकल्याने शहरात सुरु असलेल्या विकास कामांवर परिणाम होऊ लागला आहे.त्यामुळे महापालिका आयुक्तांनी आता थकीत मालमत्ता कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले असून थकबाकी वसुलीसाठी आता जप्तीची कारवाई सुरु करण्याचे आदेश महापालिकेच्या चारही प्रभाग कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार ही जप्तीची मोहीम सुरु करण्यात आली आहे. शहरातील मालमत्ता धारकांकडे महापालिकेची तब्बल 176 कोटीची जुनी थकबाकी आहे, तर चालू वर्षाची मालमत्ता कर व पाणीपट्टीची 46 कोटीची मागणी आहे. या आर्थिक वर्षात दि.1 एप्रिल ते 20 डिसेंबर या साडे आठ महिन्यांच्या कालावधीत थकीत करापोटी 15 कोटी 61 लाख, तर चालू वर्षाच्या मागणीपोटी 20 कोटी 21 लाख असे एकूण 35 कोटी 82 लाख वसूल झाले आहेत. चालू आर्थिक वर्ष संपण्यास 3 महिने कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे चालू वर्षाच्या मागणी पोटी अजून तब्बल 26 कोटी वसूल होणे बाकी आहे तर थकीत येणे बाकीची रक्कम तब्बल 160 कोटी पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या 3 महिन्यात मालमत्ता कर वसुलीवर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त वसुली करा असे आदेश महापालिका आयुक्तांनी चारही प्रभाग कार्यालयातील प्रभाग अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले आहेत.

शास्ती माफीचा अपेक्षित परिणाम नाही – महापालिका आयुक्तांनी मागील नोव्हेंबर महिन्यात मालमत्ता करावरील 2 टक्के शास्तीच्या रकमेवर 75 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला होता. आ. संग्राम जगताप यांनी मागणी केल्यानुसार व महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसुची ‘ड’ मधील प्रकरण 8 कराधान नियम 51 अन्वये प्राप्त असलेल्या स्वेच्छा अधिकारानुसार आयुक्त यांचे आदेशानुसार ज्या मिळकतधारकाकडे थकीत मालमत्ताकरावरील मागील व चालू 2 टक्के शास्तीची रक्कम आहे त्यांना दि.16 ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये त्या रकमेवर सुट देण्यात आली होती. मात्र या योजनेचा अपेक्षित परिणाम वसुलीवर दिसून आलेला नव्हता, त्यामुळे सवलतीचा कालावधी संपल्यावर आता सक्तीची वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे.

बुरूडगाव रोड प्रभाग समिती कार्यालयाकडून 3 मालमत्ता सील – महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर बुरूडगाव रोड प्रभाग समिती कार्यालयाकडून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी गेल्या आठवड्यापासून जप्ती मोहीम सुरु करण्यात आली असून सोमवार (दि.20) पर्यंत 3 मालमत्ता सील करण्यात आल्या असल्याची महिती प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांनी दिली. दरम्यात इतर प्रभाग कार्यालयामधील मोहिमेबाबत माहिती घेतली असता, गेले 15 दिवस महापालिका कर्मचारी पतसंस्था निवडणूक तसेच महापालिकेच्या प्रभाग 9 मधील पोट निवडणूक यामुळे या मोहिमेला गती मिळाली नव्हती, परंतु आता येत्या 2-3 दिवसांत या मोहिमेला वेग येईल असे वसुली विभागाकडून सांगण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा