महापालिकेत गढूळ पाण्याची पूजा मांडत चिखलाचा नैवेद्य दाखवून केली ‘आरती’

जागरूक नागरिक मंचचे महापालिकेच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन- दगडांचा वाटला प्रसाद

अहमदनगर – अहमदनगर शहरात झालेली रस्त्यांची दुर्दशा आणि शहराच्या बहुतांश भागात होत असलेला दुषित पाणीपुरवठा याबाबत महापालिका प्रशासनाकडून सुरु असलेल्या अंदाधुंद कारभारामुळे अनेक दिवस होऊनही उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ जागरूक नागरिक मंचाच्या वतीने सोमवारी (दि.13) आयुक्तांच्या दालनाबाहेर गढूळ पाण्याची पूजा मांडून अनोखे आंदोलन केले. तृतीयपंथीयांच्या हस्ते पूजा करून चिखलाचा नैवेद्य दाखवून आरती केली. आणि दगडांचा प्रसाद वाटत महा ’नरक’ पालिका असा फलक लावण्यात आला.

यावेळी बोलताना जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे म्हणाले, नगर शहरांमध्ये चालू असलेल्या अंदाधुंद निर्बंध नसलेले कुणाचीही त्यावर तज्ञ नजर नसलेले विकास कामे, डांबरट ठेकेदारांनी डांबरट पुढार्‍यांच्या संगनमताने केले बिन डांबराचे डांबरी रस्ते, भुयारी गटार योजना, पाणी योजना याचा पुरता बोजवारा उडालेला आहे. संपूर्ण अहमदनगर शहर चिखलमय झालेलं असून नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे. हे सर्व यामुळे होत आहे की महापालिकेत असलेली अभियंत्यांची कमतरता.

अभियंत्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नच कोणी करेना – अहमदनगरजवळील औरंगाबादसारख्या ठिकाणी 60 अभियंते आहेत. सोलापूर सारख्या ठिकाणी 110 अभियंते आहेत आणि नगर महापालिकेत फक्त 9 अभियंते आहेत. महापालिकेच्या आजपर्यंतच्या खर्चाच्या बाबतीत प्रशासकीय खर्च प्रचंड अनागोंदी असल्यामुळे नवीन पदे भरायला गेल्या वीस वर्षांपासून परवानगी मिळत नाही. आपले पुढारी व मनपाचे प्रशासन यासाठी काडीमात्र प्रयत्न करत नाहीत, कारण टक्केवारी घेण्याच्या पलीकडे कोणाचा काहीच अभ्यास नाही आणि उपलब्ध असलेल्या अतिशय तुटपुंज्या कर्मचार्‍यांच्या मदतीनेच या शहराच्या गोधडीला ठिगळं लावण्याचा अयशस्वी प्रयत्न ते करतात, असेही मुळे म्हणाले.

महा ’नरक’ पालिका बरखास्त करा – आज दोन महिने झाले संपूर्ण शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. पुण्याच्या राज्य सरकारच्या प्रयोगशाळेने नगरमधील पाण्याचे गुपचूप नमुने नेऊन तपासणी केली आणि असा अहवाल दिला आहे की सुमारे 13 ठिकाणी त्यांना अतिशय दूषित पाणी आढळले असून त्यातून गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनाने आधीच पिचलेल्या तसेच प्रामाणिकपणे कर भरणार्‍या जनतेला साधे पिण्याचे पाणी, आणि पाय ठेवायला रस्ता देखील जर ही महापालिका देऊ शकत नसेल तर ही महापालिका नसून टक्केवारी महानरकपालिका आहे. जिल्ह्यामध्ये नगर विकास राज्यमंत्री असून नसल्यासारखे आहेत, पालकमंत्र्यांचे तर दर्शन दुर्लभ आहे. स्थानिक सत्ताधार्‍यांविषयी तर बोलावंसं देखील वाटत नाही. अशा या अनाथ महानरकपालिकेला बरखास्त करा, अशी मागणी सुहास मुळे यांनी यावेळी केली.

निषेधाच्या घोषणांनी महापालिका दणाणली – यावेळी उपस्थित तृतीयपंथीय अम्मा, संगीता, अलका, सुंदरा, आणि जागरूक नागरिक मंचाच्या प्रामाणिक करदात्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा देत आयुक्ताचे दालन दणाणून सोडले. मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांनी आंदोलकांच्या भावना समजावून घेत उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र यावर समाधान न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. याच वेळी महापालिकेत आलेले आयुक्त शंकर गोरे यांनी मात्र कार्यालयात न येता बाहेरच्या बाहेर तेथून निघून जाणे पसंत केल्याने आंदोलक अधिक चिडले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते संजय झिंजे, जागरूक नागरिक मंचाचे योगेश गणगले, अभय गुंदेचा, सचिव कैलास दळवी, जय मुनोत, प्रसाद कुकडे, राजु लाळगे, मामा जाधव, करुणा कुकडे, श्यामा साठे, आशा गायकवाड, मयुरी मुळे यांच्याबरोबरच संतप्त महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा