पाणी व रस्त्यांच्या प्रश्नावर नगरसेवकांचे नागरिकांसह आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन

(छाया – लहू दळवी,अहमदनगर)  

अहमदनगर- महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ढवण वस्ती व तपोवन हडको परिसरामध्ये अनेक दिवसापासून तीव्र स्वरूपाचा पाणीप्रश्नच निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पाण्यासाठी वणवण भटकंती करावे लागते. याच बरोबर या भागातील रस्त्यांचा प्रश्नही तीव्र स्वरूपाचा बनला आहे. तरी आयुक्त शंकर गोरे यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालून येत्या पंधरा दिवसात पाणी व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा नागरिकांसह नगरसेवक महापालिकेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा नगरसेवक संपत बारस्कर यांनी दिला. प्रभाग क्र.1 मधील ढवण वस्ती व तपोवन हडको परिसरातील पाणी व रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, नगरसेविका मीनाताई चव्हाण, सतीश ढवण, स्वप्नील ढवण, सागर ढवण, चेपस ढवण, अशोक ढवण, रंजना उकिरडे, साधना बोरुडे, हेमलता कांबळे, स्मिता मगर, नीलम धोंडे, पल्लवी पलंगे, उज्वला टेकाळे आदी उपस्थित होते.

नगरसेवक बारस्कर म्हणाले, प्रभाग क्रमांक 1 हा सावेडी उपनगरातील नव्याने विस्तारित होणारा प्रभाग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहे. या नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत असतो. परंतु अधिकारी वर्ग नेहमीच चालढकल करतात, यापुढील काळात हे खपवून घेतले जाणार नाही. स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले म्हणाले की, प्रभाग क्रमांक एक हा नव्याने विकसित होणारा प्रभाग आहे. या ठिकाणी मूलभूत प्रश्नापासून विकास कामे करावी लागत आहे. तरी प्रभाग एक साठी मोठा निधी उपलब्ध करून द्यावा असे ते म्हणाले. आयुक्त शंकर गोरे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले की नागरिकांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. तातडीने अधिकार्‍यांची बैठक घेऊन पाणीप्रश्न ताबडतोब मार्गी लावला जाईल. तसेच रस्त्यांचा प्रश्ने मार्गी लावण्यासाठी जसा जसा निधी उपलब्ध होईल तसे तसे रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावू. यावेळी शहर अभियंता सुरेश इथापे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, अभियंता मनोज पारखे आदी उपस्थित होते. नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दीपाली बारस्कर, नगरसेविका मीनाताई चव्हाण यांनी प्रभागातील विविध मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुक्तांचे लक्ष वेधले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा