भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा आणावा

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासची मागणी

अहमदनगर – भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा करण्याच्या मागणीचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य सचिव अशोक सब्बन, जिल्हा संघटक सुधीर भद्रे, ॲड. कारभारी गवळी, ऍड. श्याम आसवा, वीरबहादूर प्रजापती, पोपटराव साठे, सुनील टाक, अशोक डाके आदी उपस्थित होते. 1 जानेवारी 2014 रोजी केंद्रात लोकपाल कायदा मंजूर झाला. तर मार्च 2019 मध्ये केंद्र सरकारने लोकपालची नियुक्ती केली. केंद्रीय लोकपाललोकायुक्त कायद्यातील तरतुदीनुसार लोकपाल कायदा लागू झाल्यापासून एक वर्षाच्या आत सर्व राज्यात लोकपालाच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा करावा अशी तरतूद आहे. ज्या महाराष्ट्रातून ऐतिहासिक लोकपाललोकायुक्त कायद्याचे आंदोलन सुरू झाले, त्याच महाराष्ट्रात अद्यापि सक्षम लोकायुक्त कायदा झालेला नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

स्वातंत्र्योत्तर थोडा कालावधी वगळला तर राज्यात व देशात मोठ्या प्रमाणावर शासकीय अधिकारी आणि लोकसेवकांचे विशेषत: मंत्रीमहोदयांचे भ्रष्टाचार उघडकीस आले आहेत आणि येत आहेत. मात्र या भ्रष्ट व्यक्तींना शिक्षा झाल्याचे क्वचितच आढळते. त्यामुळे सामान्य जनतेचा शासन आणि प्रशासनावरील विश्‍वास डळमळीत होतो व न्यायालयाबाबत सुद्धा संभ्रम निर्माण होतो. सध्या राज्यात मुख्यमंत्र्यांकडून नेमले गेलेले लोकायुक्ताला कायद्याने स्वायत्तता नसल्यामुळे सदर लोकायुक्त सक्षम नाही. यामुळे राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पुढाकारातून लोकायुक्त कायद्यामध्ये भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे अधिकार राज्यातील जनतेला दिलेले असून, कायद्याने लोकायुक्तांना स्वायत्तता दिली आहे. लोकायुक्तांवर सरकारचे नियंत्रण नाही, तर जनतेचे नियंत्रण राहणार आहे. यासाठी सक्षम लोकायुक्त कायदा होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा तातडीने करण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा