अहमदनगर बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांनी स्व.दादा पाटलांच्या नावाचा आब राखावा

एकमेव राहिलेली सहकारी संस्था तरी विकण्याऐवजी टिकवावी- प्रताप पाटील शेळके यांचे आवाहन

अहमदनगर – माजी खा. स्व. दादापाटील शेळके हे नाव होण्यासाठी 40 वर्ष परिश्रम घ्यावे लागले आहेत. एका रात्रीत हे नाव झालेले नाही, नगर बाजार समितीतील सत्ताधारी मंडळींनी त्यांच्या राजकारणासाठी बाजार समितीला दादा पाटलांचे नाव दिले आहे, पण त्यांचा कारभार भलताच चालू आहे, हे पाहून पाटलांच्या आत्म्याला नक्कीच प्रचंड वेदना होत असतील, त्यामुळे सत्ताधार्‍यांनी दादा पाटलांच्या नावाचा आब राखावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांना केले आहे. तसेच आता नगर तालुक्यासाठी एकमेव सहकारी संस्था राहिलेली आहे. ती तरी विकण्याऐवजी टिकवावी असा टोलाही लगावला आहे. नगर बाजार समितीला आलेल्या कारणे दाखवा नोटीससंदर्भात महाआघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर बाजार समिती पदाधिकार्‍यांनी महाआघाडीच्या नेत्यांवर टीका केली होती. त्यास महाआघाडीने पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी जि. प. सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ, माजी संचालक संपतराव म्हस्के, पंचायत समितीचे सभापती संदीप गुंड, माजी सभापती रामदास भोर, उपसभापती दिलीप पवार, माजी उपसभापती रवी भापकर, प्रवीण कोकाटे, गुलाब शिंदे, प्रकाश कुलट, भाऊ तापकीर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रताप पाटील शेळके यांनी बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांवर जोरदार टीका केली. नगर बाजार समितीचे संचालक मंडळ नामधारी असून कारभार दुसरेच पाहतात. आदर्श चाललेल्या संस्था ताब्यात घेऊन या संस्थांच्या जमिनी विकणे हा उद्योग सध्या नगर तालुक्यात सुरू आहे. बाजार समिती नेप्ती उपबाजारात हलवून नगरची जागा विकण्याचा काहींचा डाव आहे. असा आरोपही प्रताप शेळके यांनी बाजार समितीच्या नेत्यांवर व संचालक मंडळावर केला. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले म्हणाले, बाजार समितीला ज्या मुद्द्यांच्या आधारे नोटीस निघाली त्याला उत्तर देण्याऐवजी पदाधिकार्‍यांनी व्यक्तिगत टीका केली गेली. आम्ही नियमानुसार तक्रार केली, त्यामुळेच चौकशी झाली, आम्ही तक्रारदार असल्यानेच आम्हांला नोटिसा मिळाल्या. आम्ही कधीच सत्तेचा दुरुपयोग केला नाही. उलट भाजपच्या काळात चौकशी झाली. त्यांनीच सत्तेचा वापर करत चौकशी अहवाल दडवून ठेवला. आम्ही दुरूपयोग केला असता तर बाजार समिती केव्हाच बरखास्त झाली असती. सत्ताधार्‍यांमध्ये हिंमत असेल तर या आरोपांना 2 दिवसांत उत्तर द्यावे. बाळासाहेब हराळ म्हणाले, मी कोणत्या पक्षात आहे याची काळजी करण्यापेक्षा बाजार समिती पदाधिकार्‍यांनी आपला पक्ष कोणता हे सांगावे. दिवसभर भाजपत व रात्री हे राष्ट्रवादीत असतात. गाडे सरांनी 2009 च्या निवडणुकीत कर्डिले यांना मदत केली नसती तर ते आज राजकारणात दिसले नसते, या उपकाराची जाण न ठेवता विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनीच गाडे सरांना फसविले, हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे.आमच्यावर काय टीका करायची ती जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी करा, अगोदर बेकायदेशीर गाळे, कर्मचार्‍यांचा थकलेला पी.एफ., सहावा वेतन आयोग याचे काय झाले ते सांगा, असे आव्हानही हराळ यांनी दिले. बासाहेब गुंजाळ यांनीही बाजार समितीच्या संचालक मंडळावर यावेळी टीका केली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा