संघर्षशील व अभ्यासू व्यक्तीमत्त्व – राजेंद्र गांधी

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जीवनात यशस्वी होतानाच समाजातील चुकीच्या प्रवृत्तींवर बोट ठेवत सार्वजनिक कार्यातही तितकाच उत्साही सहभाग नोंदविणारे अभ्यासू व्यक्तीमत्त्व राजेंद्र गांधी यांचा (दि.16 सप्टेंबर)आज वाढदिवस. यानिमित्त गांधी यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख…

उत्कर्ष म्हणजे फक्त स्वत:चा विकास नसून आपल्या आजूबाजूला असलेल्या व आपल्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाची प्रगती झाली पाहिजे. आपल्या डोळ्यादेखत एखाद्या चांगल्या संस्थेत चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याविरोधात आवाज उठविलाच पाहिजे अशा भावनेने समाजकारणात सक्रिय असलेले नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांचे नाव नगरकरांना परिचित आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या राजेंद्र गांधी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत व्यवसायात मोठी झेप घेतली. सहकारमहर्षी सुवालाल गुंदेचा यांचा सहवास व मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्यांनी सहकारी बँकिंग क्षेत्रातही ठसा उमटविला. चुकीच्या गोष्टींबाबत प्रचंड चीड असल्याने ते सातत्याने संघर्ष करीत असतात. या प्रवासात कितीही संकटे आली तरी ते न डगमगता ठामपणे उभे राहतात. समविचारी मंडळींना सोबत घेवून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ते करीत असतात. 1986 मध्ये बीएस्सीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एमआयडीसीत धूत कॉम्पॅक प्रा.लि.कंपनीत नोकरी सुरु केली. त्याकाळी महिना फक्त 500 रुपये मिळत असे. यासाठी ते दररोज 11 किलोमीटरचा नवीपेठ ते एमआयडीसी सायकल प्रवास करायचे. 1990 ला विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांच्यातील मूळ व्यापार वृत्ती जागी झाली व 1992 मध्ये त्यांनी राज टेक्स्टाईल्सच्या माध्यमातून कापड व्यापार सुरु केला. यासाठी त्यांनी नगर अर्बन बँकेकडून त्याकाळी 50 हजारांचे कर्ज मिळवले. या क्षेत्राचा बारकाईने अभ्यास करीत त्यांनी व्यवसायात बस्तान बसविले.

याच दरम्यान ते सामाजिक कार्यातही ओढले गेले. 1997 ला नवीपेठेत जय आनंद युवक मंडळाची स्थापना झाली व मंडळाचे पहिल्याच वर्षी चांदीची गणेश मूर्ती साकारली. मंडळाचे ते प्रमुख संस्थापक होते. 1995 पासून ते जैन ओसवाल पंचायत सभेचे ट्रस्टी आहेत. 1999 मध्ये त्यांनी कालिका नागरी सहकारी पतसंस्थेच्या उभारणीत सक्रिय योगदान दिले व ते संस्थापक संचालक बनले. गांधी यांची सहकार क्षेत्रातील हे पदार्पण भविष्यातील मोठ्या भरारीची नांदी ठरले. 2000 मध्ये सहकारमहर्षी सुवालाल गुंदेचा यांनी स्थापन केलेल्या जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेचेही ते संस्थापक संचालक बनले. सलग अकरा वर्षे ते या पतसंस्थेचे संचालक व अडीच वर्षे व्हाईस चेअरमन होते. गांधी यांचा अभ्यास, सहकाराचे त्यांनी आत्मसात केलेले ज्ञान पाहून सुवालालजी यांनी त्यांना नगर अर्बन बँकेत घेतले. 2008 ते 2014 या कालावधीत ते अर्बन बँकेचे संचालक होते. याच दरम्यान त्यांच्यातील अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची उर्मी आणखी प्रबळ झाली. 2009 पासून त्यांनी अर्बन बँकेतील गैरप्रकारांवर बोट ठेवण्यास सुरुवात केली. सभासदांनी ज्या विश्वासाने आपल्याला संचालक पदाची जबाबदारी दिली त्या विश्वासाला तडा जाणार नाही यासाठी त्यांनी आवाज उठविला. चुकीच्या प्रवृत्तींविरोधात आवाज उठवताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला. शारीरिक हल्ल्यांनाही त्यांनी तोंड दिले. नगर अर्बन बँकेला मल्टीस्टेटचा दर्जा मिळवून देण्याचा तत्कालिन सत्ताधार्यांचा निर्णय त्यांना अजिबात रुचला नाही. यातून बँकेची अधोगतीच होईल असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांची ती भूमिका कालांतराने खरी ठरल्याचेच समोर आले. बँकेतील भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवत त्यांनी संबंधित यंत्रणेकडे वेळोवेळी दाद मागितली. यातूनच 2019 ला बँकेचे तत्कालिन संचालक मंडळ बरखास्त करून रिझर्व्ह बँकेने बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली. काही पदाधिकार्‍यांच्या चुकीच्या कामामुळे बँक अडचणीत आली असली तरी सभासदांचे व्यापक हित पाहता बँक वाचली पाहिजे यासाठी त्यांनी बँक बचाव समितीची स्थापना केली. बँकेवरील लोकांचा विश्वास कायम रहावा यासाठी स्वत:पासून सुरुवात करीत बँकेकडे ठेवी ठेवल्या. बँकेला पुन्हा वैभवशाली बनविण्याचा संकल्प करून ते सध्या अहोरात्र मेहनत घेत आहेत. बँकेच्या प्रशासनावर अंकुश ठेवत कर्ज वसुलीला चालना मिळेल यादृष्टीने पाठपुरावा करीत आहेत. बँकिंग क्षेत्राबरोबरच भगवान महावीर चषक परिवाराचेही ते सक्रिय सदस्य आहेत. निसर्गावर ते भरभरुन प्रेम करतात. निसर्ग मित्र मंडळाच्या माध्यमातून ते पर्यावरण संवर्धनाच्या कार्यातही सातत्याने योगदान देत असतात. अहमदनगर ठोक कापड व्यापारी असोसिएशनचेही ते अनेक वर्षांपासून पदाधिकारी आहेत. या असोसिएशनच्या माध्यमातूनही ते सामाजिक कार्य करीत असतात. समाजासाठी कायम झटणार्‍या या अभ्यासू व्यक्तीमत्त्वास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

बापूसाहेब गोरे, अहमदनगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा