अहमदनगर विकासाची भूमिका ठेवून काम करणार-मनपा सभागृह नेते अशोक बडे

अहमदनगर- अहमदनगर विकासाची भूमिका ठेवून महापालिकेत काम करण्याचा माझा प्रयत्न असून, नगर मनपा सभागृह नेता म्हणून माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे. या पदाच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासाला विशेषत: बोल्हेगांव, नागापूर, तपोवन सारख्या शहराभोवतीचे उपनगरातील नागरी समस्या आणि विकासाला गती देण्याचा मी प्रयत्न करीन, असे आश्वासन नगर महापालिकेचे नवे सभागृहनेते व बोल्हेगांवचे नगरसेवक अशोक बडे यांनी दिले. जय भगवान बाबा महासंघाच्या नगर जिल्हा शाखा व लोकनेते गोपीनाथ मुंडे विचार मंचच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांच्या हस्ते श्री. बडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. बडे बोलत होते. याप्रसंगी महासंघाचे राजू शिंदे केबलवाले, प्रशांत मुर्तडकर, विकी वायभासे, मेजर पालवे, शशिकांत सोनवणे, संजय सानप, सौरव साळवे, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, शिवाजी गर्जे (मेजर), दिपक कावळे आदिंनी श्री. बडे यांना मिळालेली संधी वंजारी समाजाला न्याय देणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. पुढे बोलतांना श्री. बडे म्हणाले, मिळालेल्या संधीच सोनं करुन माझ्या प्रभागातील जनतेने, पक्षनेत्यांनी आणि सहकार्‍यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा न जावू देता, त्यांचा विश्वास अधिक दृढ करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन. समाजाचे माझ्यावर ऋण आहे. या निमित्ताने ते फेडण्याचाही मी प्रयत्न करीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप म्हणाले, राजकारण आणि समाजकारणात अशोक बडे नगरसेवक म्हणून नगरकरांना आणि जिल्ह्याला परिचित आहे. आपण जनतेसाठी आहोत ही त्यांची भावना आहे. नगर महापालिकेचे सभागृहनेते म्हणून त्यांनी नुकताच पदभार घेतला आहे. या पदाच्या माध्यमातून नगर विकासाला गती देतांना समाजाचे आणि लोककल्याणाचे प्रश्नातही ते लक्ष घालतील. सभागृह नेते म्हणून जबाबदारी अधिक आहे पण, आपणाला अशीच पदोन्नत्ती मिळत नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी शुभेच्छा देत श्री. सानप यांनी बडे यांचे अभिनंदन केले. महापौर रोहिणी शेंडगे यांचाही यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी सत्कार केला. यावेळी ते म्हणाले, वंजारी समाजाला महापालिकेत जो सन्मान दिला याबद्दल महापौर, सर्व नगरसेवक, महाआघाडीचे पदाधिकारी, आमदार या सर्वांचे महासंघ व मुंडे विचार मंच आभारी आहे. महापालिकेतील ही एकजूट अशीच सर्वांना बरोबर घेत नगरचा विकास साधावा, असे आवाहन केले. यावेळी नगरसेवक दत्ता पा. सप्रे, माजी नगरसेवक विक्रम राठोड, माजी उपमहापौर विजय बोरुडे, दत्ता जाधव, नगरसेवक राम नळकांडे, संभाजी कदम, अनिल शिंदे, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक संजय शेंडगे, सेनेच्या आशा निंबाळकर आदि उपस्थित होते. राजू शिंदे यांनी प्रास्तविक केले तर प्रशांत मुर्तडकर यांनी आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा