मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज – मार लागल्यास डोक्याला टेंगूळ का येते?

कोणी झाडावरून पडतो, कोणाला दगड लागतो, कोणी पाय घसरून पडतो; हे झाल्यावर सर्वांनाच दुखते. काही वेळा सूजही येते. डोक्याला लागल्यास येणारी सूज म्हणजे टेंगूळ. असे का होते ते आता समजावून घेऊ. इजा झाल्यास वा दुखापत झाल्यास शरीरात दाहाची प्रक्रिया चालू होते. दुखापतीमुळे पेशी दुखावल्या जातात किंवा मरतात. या मृत पेशींमधून काही रासायनिक पदार्थ बाहेर पडतात. या पदार्थांना प्रतिसाद म्हणून त्या भागाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. व तेथे विशिष्ट प्रकारच्या पांढर्‍या पेशी गोळा होतात. या रक्तपेशी मृतपेशी तसेच तेथील (असल्यास) सूक्ष्म जीवजंतूना गिळून टाकतात. काही वेळा या पेशी रासायनिक पदार्थ निर्माण करून जीवजंतूंचा नायनाट करतात. दुखापत झालेला भाग लाल होणे, तेथील तापमान वाढणे, तसेच तेथे सूज येणे ही लक्षणे उपरोक्त कारणांमुळे होतात. डोक्यामध्ये कवटी व त्याभोवती घट्ट त्वचा असते. या रचनेमुळे सुजलेला भाग जास्त प्रकर्षाने जाणवतो. मांडी, हात व मांसल भागात मात्र अशी सूज इतकी प्रकर्षाने जाणवत नाही. म्हणून डोक्याला लागले की टेंगूळ येते. काही दिवसात शरीरातील पांढर्‍या रक्तपेशी आपले काम पूर्ण करतात व टेंगूळ दिसेनासे होते. दाह कमी करणार्‍या गोळ्यांनीही वेदना व सूज कमी करता येते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा