बनावट एटीएम कार्ड तयार करून लाखोंची लूट करणार्‍या टोळीचा मुख्य सूत्रधार अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी पकडला

अहमदनगर – पेट्रोल पंपावर एटीएम कार्ड स्वॅप करून पैसे जमा करताना त्या कार्डाचे स्कॅनिंग करून डाटा चोरणे व त्याआधारे बनावट एटीएम कार्ड तयार करून नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे लुटणार्‍या टोळीचा मुख्य सूत्रधाराला नगरच्या सायबर क्राईम पोलिसांच्या पथकाने ठाणे येथे पकडले आहे. सुजित राजेंद्र सिंग (रा. वसई-विरार, जि. पालघर, मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे. मे महिन्यात एटीएम कार्ड क्लोन करून त्याद्वारे वेगवेगळ्या एटीएममधून पैसे काढत एक लाख 44 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी नगरच्या भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक मनोज पाटील व अप्पर पोलिस अधिक्षक सौरभ अगरवाल यांनी सायबर सेलला दिल्या होत्या. या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करताना एटीएम सेंटर येथील सीसीटीव्ही फुटेजवरून सायबर क्राईम पोलिसांच्या पथकाने धीरज अनिल मिश्रा व सुरज अनिल मिश्रा (रा. नायगाव , मुंबई) या 2 आरोपींना कल्याण रोडने पाठलाग करून टोकावडे, ता.ठाणे येथे पकडले होते. त्यांच्याकडून 31 बनावट एटीएम कार्ड व 2 लाख 61 हजार 500 रुपये हस्तगत करण्यात आले होते. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सुजित राजेंद्र सिंग हा असल्याचे समोर आले. तेव्हापासून सुजित सिंगहा फरारी होता.

दि.11 सप्टेंबर रोजी नगरच्या सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना सुजित सिंग हा मिरारोड, वसई येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, कर्मचारी योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरुण सांगळे, गणेश पाटील, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तेथे जाऊन सापळा लावला. या सापळ्यात सुजित सिंग अलगत अडकल्याने तेथूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लॅपटॉप, 5 मोबाईल हँडसेट, एक संगणक, 17 पेन ड्राईव्ह, एटीएम कार्ड क्लोन करण्यासाठी वापरले जाणारे 4 स्कीमर मशीन, एक कलर प्रिंटर, 54 बनावट एटीएम कार्ड, बनावट एटीएम कार्ड करण्यासाठी लागणारे 46 कोरे कार्ड, 6 विविध कंपन्यांचे सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुजित राजेंद्र सिंग यांच्याविरोधात यापूर्वी अहमदाबाद, सुरत व मुंबई येथे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा