अहमदनगर- नगर तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.18) जाहीर झाला असून यामध्ये दिग्गजांनी आपले गड राखल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले. तर अनेक ठिकाणी मतदारांनी सत्ता परिवर्तन घडवून आणल्याचे पहावयास मिळाले. नगर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींची पंचवार्षीक निवडणूक जाहीर झाली होती. यातील अकोळनेर, दशमी गव्हाण व वारुळवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. तर 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया झाली.
तालुक्यात सरासरी 81.32 टक्के मतदान झाले होते. एकूण 1 लाख 23 हजार 961 मतदारांपैकी 1 लाख 808 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतम ोजणीची प्रक्रिया सोमवारी (दि.18) सकाळी 9 वाजता सावेडी उपनगरातील डॉ. ना. ज. पाऊलबुधे विद्यालयात तहसीलदार उमेश पाटील व निवासी नायब तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण 4 फेर्या पार पडल्या. या मतमोजणी नंतर जाहीर झालेल्या निकालात तालुक्यातील विविध पदाधिकार्यांनी आपले गड राखल्याचे दिसून आले. नगर पंचायत समितीचे सभापती प्रविण कोकाटे व भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांच्या पॅनलने चिचोंडी पाटील ग्रामपंचायत निवडणुकीत 15 पैकी 9 जागा मिळवत बहुमत प्राप्त केले. बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांच्या तांदळी वडगाव ग्रामपंचायतीत घिगे गटाच्या 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या. 2 जागांसाठी मतदान होऊ या दोन्ही जागा घिगे गटाने जिंकल्या आहेत. त्यामुळे तांदळी वडगाव ग्रामपंचायतीवर सभापती घिगे गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब दरेकर व महेंद्र हिंगे गटाने वाळुंज ग्रामपंचायतीत सत्ता मिळवत आपले वर्चस्व अबाधीत ठेवले आहे.
दरेवाडी ग्रामपंचायतीत भाजपाचे सरपंच अनिल करंडे गटाने 13 जागा मिळवत सत्ता प्राप्त केली आहे. टाकळी काझी ग्रामपंचायतीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के गटाचा पराभव झाला असून तेथे शिवसेनेच्या गटाची सत्ता आली आहे. निंबळकमध्ये जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे गटाने आपली सत्ता अबाधीत ठेवली आहे. शिंगवे नाईक येथे भाजपाचे सुनील जाधव यांच्या गटाची सत्ता आली आहे. डोंगरगण ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झाले असून तेथे सरपंच कैलास पटारे गटाला पराभवाचा धक्का बसला आहे. पिंपळगाव माळवी येथे भाजपा प्रणीत पॅनलला 8 जागा मिळाल्या असून विरोधी गटास 5 जागा मिळाल्या आहेत. देहर्यात भाजपाच्या गटाने सत्ता मिळवली असून महाआघाडीचा पराभव झाला आहे. खारेकर्जुने येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता पा. शेळके व अंकुश पाटील शेळके यांनी मागील निवडणुकीचा वचपा काढत पुन्हा सत्ता मिळवली आहे. वाकोडी ग्रामपंचायतीत बाजार समितीचे संचालक हरिभाऊ कर्डिले गटाने सत्ता मिळवली आहे. चासमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. कामरगावमध्ये रावसाहेब साठे गटाला पराभवाचा धक्का बसला असून तेथे महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. हमीदपूर, इमामपूर या ग्रामपंचायतीतही महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. विळद ग्रामपंचायतीत जगताप व अडसुरे गटाचा पराभव झाला आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत गटाने सत्ता मिळवली आहे. घोसपुरी ग्रामपंचायतीत पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर व उपसरपंच प्रभाकर घोडके गटाने सत्ता मिळवली आहे. रतडगाव ग्रामपंचायतीत भाजपच्या तुकाराम वाघुले गटाची सत्ता आली आहे. गुणवडी ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीने बाजी म ारली आहे. इसळकमध्ये शिवसेना महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. देवगावमध्ये बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक विलासराव शिंदे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. बहिरवाडी, हातवळण, वाटेफळ या ग्रामपंचायतीत भाजपा प्रणीत गटाच्या सत्ता आल्या आहेत. पिंपळगाव वाघा येथे भाजपाच्या गटाला बहुमत मिळाले असून तेथे भाजपाला 8 तर विरोधकांना 5 जागा मिळल्या. खंडाळा ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांच्या गटाने बहुमत मिळवले आहे. खिडकी ग्रामपंचायतीत माजी सरपंच प्रविण कोठुळे गटाने सत्ता मिळवली आहे.
ससेवाडी ग्रामपंचायतीत भाजपाची सत्ता आली आहे. पिंपरी ग्रामपंचायतीत रभाजी सुळ यांच्या गटाने बाजी मारली आहे. सांडवे, बाराबाभळी ग्रामपंचायतीत भाजपा प्रणीत गटाची सत्ता आली आहे तर धनगरवाडीत महाविकास आघाडीने बाजी मारली. भोरवाडी ग्रामपंचायतीत पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर गटाला पराभवाचा धक्का बसला आहे. तेथे विरोधी गटाची सत्ता आली आहे. मांजरसुंबा ग्रामपंचायतीत सरपंच जालिंदर कदम यांनी आपली सत्ता आबाधीत ठेवली आहे. माथनी ग्रामपंचायतीत शिवसेना-महाविकास आघाडी गटाची सत्ता आली आहे. पोखर्डी ग्रामपंचायतीत रामेश्वर निमसे, सौ. पल्लवी ढवळे, सौ. स्वाती चौरे, राहुल वारुळे, अंतु वारुळे, जगन्नाथ निमसे, सौ. आशा निमसे हे उमेदवार विजयी झाले आहेत. गुंडेगाव ग्रामपंचायतीत माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या गटाला 6 तर विरोधी गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी सत्तेच्या चाव्या अपक्षाच्या हातात गेल्या असून, 1 अपक्ष निवडून आला आहे. निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्रा बाहेर मोठी गर्दी झाली होती. निकाल जाहीर होताच विजयी झालेल्या उमेदवार व समर्थकांचा गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू होता. मतमोजणी केंद्र परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बुर्हाणनगर ग्रामपंचायतीवर कर्डिले गटाचे निर्विवाद वर्चस्व
बुर्हाणनगर ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले गटाने सातही जागा जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. या ग्रामपंचायतीच्या 15 जागांपैकी 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 7 जागांवर विरोधी महाआघाडीच्या गटाने उमेदवार दिल्याने या 7 जागांसाठी निवडणुक झाली. निवडणुक प्रचाराच्या कालावधीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह नगर शहरामधील शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकार्यांनी बुर्हाणनगरला सभा, प्रचार फेर्या काढून कर्डिलेंच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप केले होते. मात्र मतदारांनी विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत पुन्हा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले गटाकडे सत्ता सोपवली आहे. या ग्रामपंचायतीत 15 पैकी 15 जागा कर्डिले गटाच्या आलेल्या आहेत. या ग्रामपंचायतीत सविता सुशिल तापकिरे, रावसाहेब तुळशीराम कर्डिले, शितल दिपक धाडगे, वैभव विनायक वाघ, निखिल ज्ञानेश्वर भगत, मंगल विष्णु कर्डिले, दिलावर जमालभाई पठाण, सरस्वती निवृत्ती कर्डिले, मंदा नंदू साळवे, भास्कर कुंडलिक पानसरे, सुनिता प्रसाद तरवडे, सुषमा अजिनाथ साळवे, स्वाती रविंद्र कर्डिले, जालिंदर जाधव, राजेंद्र पाखरे हे ग्रामपंचायत सदस्य झाले आहेत. या विजयी उमेदवारांचा युवा नेते अक्षय कर्डिले व संदीप कर्डिले यांनी सत्कार केला.
30 वर्षांनंतर निवडणूक झालेल्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता
ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशाला दिशादर्शक असणारे ’आदर्श गाव हिवरेबाजार’ येथे 30 वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. या हिवरेबाजार ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.18) सकाळी जाहीर झाला असून, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाला आहे. हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने सातही जागांवर विजय मिळवलेला आहे. आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये तब्बल 30 वर्षांनंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदानाच्या दिवशी मतदारांनी सकाळपासूनच यासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी निवडणूक बिनविरोध होऊ शकली नसली, तरी निवडणूक कशी असावी, याचाही आदर्श घालून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले होते. गावातील किशोर संबळे यांनी पुढाकार घेऊन पोपटराव पवार यांच्याविरोधात पॅनल उभा केल्याने येथील निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे यावेळी मतदान झाले. ग्रामस्थांनी उत्साहात त्यामध्ये भाग घेतला. अन्य निवडणुका सोडल्या, तर ’ईव्हीएम’ आल्यानंतर झालेली ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक ठरली. दरम्यान पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे 1990 पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही. मात्र, यंदा प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे गेले.
नवनागापूरमध्ये शिवसेनेला धक्का; बबन डोंगरे – दत्ता सप्रे गटाचे वर्चस्व
शहरालगत असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. येथे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 17 पैकी 13 जागा जिंकून बबन डोंगरे, दत्ता सप्रे यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. मागील वेळी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे आप्पासाहेब सप्रे यांनी वर्चस्व मिळविले होते. यावेळी बबन डोंगरे, दत्ता सप्रे यांनी एकत्रितपणे निवडणूक लढविली होती. महापौर बाबासाहेब वाकळे यांचे दत्ता सप्रे हे व्याही आहेत. व्याह्यांसाठी महापौर वाकळे हे ही मैदानात उतरले होते. तर सेनेकडून माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह पदाधिकारी या निवडणूक सक्रीय होते. बबन डोंगरे-दत्ता सप्रे यांनी निवडणूक एकत्र लढविल्याचा फायदा झाला. यामुळे त्यांच्या गटाला 13 जागा मिळाल्या. आप्पासाहेब सप्रे यांच्या गटाला 4 जागांवरच समाधान मानावे लागले.