बजेटमध्ये नगरकरांना नगर-पुणे इंटरसिटीची भेट मिळण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वेधणार लक्ष

अहमदनगर – नगरकरांच्या दृष्टीने महत्त्वाची व प्रतीक्षेत असलेली नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासाठी मागील बारा वर्षांपासून कृती समिती कार्यरत आहे. कृती समितीने खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार दिलीप गांधी, माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु ठेवलेला असून, हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी कृती समिती प्रयत्नशील राहणार आहे. तर सादर होणार्‍या रेल्वे बजेटमध्ये नगरकरांना ही रेल्वेची भेट मिळण्यासाठी कृती समिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून निवेदनांची मोहिम राबविणार असून, रेल्वे मंत्री, खासदार व रेल्वे अधिकारी यांना निवेदन पाठवून त्यांचे लक्ष वेधले जाणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष हरजितसिंह वधवा यांनी दिली.

या मोहिमेसाठी कृती समितीचे वधवा, उपाध्यक्ष अर्शद शेख, प्रशांत मुनोत, सुनील छाजेड, विपुल शाह, संजय सपकाळ, शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोक कानडे, अजय दिघे, संतोष बडे, संजय वाळूंज, सय्यद साबीरअली, जस्मितसिंह वधवा, महेश शहाणे आदी प्रयत्नशील आहेत. आ.संग्राम जगताप यांच्यासह रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी माजी पालकमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना नगर-पुणे रेल्वे सुरू होण्यासाठी निवेदन दिले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचे देखील सदर प्रश्नी लक्ष वेधण्यात आले होते. तसेच महापालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी 2016 साली तत्कालीन महापौर सुरेखा कदम यांना देखील निवेदन दिले होते. 2017 साली शिर्डी येथे सुमारे एक लाख सह्यांच्या मोहिमेचे निवदेन तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना देण्यात आले.

याचबरोबर 2018 साली शनी शिंगणापूर येथे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना देखील कृती समितीच्या वतीने निवेदन देऊन विस्ताराने चर्चा करण्यात आली. त्यावेळी कॉड लाईनची समस्या सांगण्यात आली होती. रेल्वे अधिकारी यांनी पहिले कॉडलाईन झाल्यानंतर रेल्वे सुरू करू, त्यानंतर दौंड येथे कॉडलाईन करिता प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर सदर इंटरसिटी रेल्वे सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. यासाठी खासदार सुजय विखे पाटील यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये संसदेत देखील सदर विषय उपस्थित केला होता. मार्च महिन्यात कोरोनाचे कारण पुढे करुन सदर प्रश्न प्रलंबीत ठेवण्यात आला. आज अहमदनगरकरांच्या दृष्टीने हा विषय जिव्हाळ्याचा झाला असून, ते होणे गरजेचे आहे. यासाठी नोव्हेंबरपासून कृती समितीच्या वतीने पुढील रेल्वे बजेटमध्ये नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेची तरतूद करण्याच्या मागणीचे निवेदन रेल्वे मंत्री व अधिकार्‍यांना पाठविण्यात आले आहेत. सध्या पुण्याकरिता सर्व पॅसेंजर गाड्या बंद असल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत असल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. पुणे-दौंड पर्यंत इंटरसिटी एक्सप्रेस सुरू आहे. त्यापुढे नगर फक्त 80 किलोमीटरवर आहे. त्यामुळे नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे होण्यास काहीही अडचण नाही. नगर-पुणे रस्त्यावर दिवसेंदिवस वेगाने वाढणारी वाहनांची संख्या, वाढती अपघातांची संख्या, त्यात जाणारे बळी, त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाची सातत्याने वाढती गरज, मात्र त्यासाठी जागेची अनुपलब्धता, परिणामी दळणवळणावर होणार विपरित परिणाम, लोकांचा प्रवासासाठी होणारा खर्च व वाढणारा वेळ याचा विचार करता रेल्वेसेवा हाच समर्थ पर्याय आहे. तशी रेल्वे सुरू झाल्यास दररोज नगर-पुणे दरम्यान प्रवास करणार्‍या नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असल्याचे वधवा यांनी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा