मॅडम बस्स… आता जरा जास्तच होतयं… अरे कायदे करणार्‍यांनो जरा आमचाही विचार करा

देशाची करपद्धती सोपी व सुटसुटीत होणार! या आश्वासनाची पुर्तता करताना देशाच्या करपद्धतीचे मात्र तीन तेरा वाजले आहेत. अशा या किचकट करपद्धतीला व्यापारीवर्ग अगोदरच वैतागला असताना आता करसल्लागार व सी.ए. सुद्धा हवालदिल झाले आहेत. अरे कायदा करणार्‍यांनो जरा आमच्या जागेवर बसुन पहा अस्थिर अशा जी.एस.टी.च्या तरतूदीचे पालन करता करता नाही तुम्ही स्वत:च अस्थिर झालात तर काय राहील? कोरोनासारख्या महामारीशी दोन हात करताना व्यापारी जनता यांचे जे हाल झाले आहेत याची तुम्हाला थोडीशीही जाणीव राहीलेली दिसत नाही. त्यात आपण देशाची करपद्धती सोपी करण्याच्या नावाखाली व्यापार्‍यांकडुन अवाजवी विलंब शुल्क व दंड वसुल करता आहात. व्यापारी व सामान्य जनतेला छळण्यासाठी तुम्ही जी.एस.टी. सारखा राक्षस बाजारामध्ये मोकळा सोडला आहे. व्यापारी व सामान्य जनतेबरोबर आता तुम्ही आमच्यासारख्या करसल्लागार व सी.ए. यांनाही सोडले नाही आता त्यांचाही बळी घेणार कि काय? आज सर्व करसल्लागार व सी.ए. धावपळ, टेंशन व दबावाखाली काम करत आहेत. आम्ही सरकार व व्यापारी यांना जोडणारा एक दुवा आहोत. तुम्ही वेळोवेळी लागु केलेले किचकट कलम व कायदे व्यापार्‍यांना सरळ भाषेत समजुन सांगुन त्यांच्याकडुन करस्वरुपात अर्थार्जन करुन आपल्याकडे सोपवण्याचे व देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याचे प्रामाणिक काम कित्येक वर्षापासुन आम्ही करत आहोत आणि आता आपणच आमच्या जीवनाशी खेळत आहात. रोज बदलणार्‍या अस्थिर अशा जी.एस. टी. कायद्याच्या तरतुदी एकदा न्याहाळुन पहा. तुम्हाला तुम्हीच तयार केलेला कायदा व त्याच्या तरतुदी समजल्या व मनाला पटल्या तर काय नवल? अशा या अस्थिर कायद्याच्या रोज बदलणार्‍या तरतुदी व त्यानुसार आपण मागणी करत असलेले वेगवेगळी (GSTR-3B, GSTR-1, GSTR-9, GSTR-9C  व इतर) पत्रके यांची पुर्तता करता करता आमच्या नाकी नऊ आले आहेत. याबरोबर आयकर कायद्यान्वये सन 2019-2020 चे वार्षिक विवरणपत्र भरणे व त्याचे ऑडीट करणे ते वेगळेच आणि हे सगळे करायला तुम्ही दिलेला कालावधी व तारखा यामुळे आमच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत आणि ते अचानक कधी थांबतील हे सांगु शकत नाही. अशा या तारखांच्या दबावाखाली काम करत असताना आम्ही सर्वानी प्रामाणिकपणे मागणी करुनही दहा व पंधरा दिवसांची मुदतवाढ भिकेत देणार्‍यांनो तुम्ही आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अहो! किती माहित्या मागवणार? आणि किती पत्रके भरावयास लावणार? याची थोडीतरी मर्यादा ठेवा. आपण व्यापार्‍यांना वेगवेगळ्या तारखा व वेळेचा धाक दाखवून त्यांच्याकडुन अवाजवी विलंब शुल्क व दंड वसुल करता आणि आपण स्वत: मात्र आयकर विवरणपत्र व ऑडीट तसेच जी.एस.टी. ऑडीटसाठी लागणारी युटीलीटी आर्थिक वर्ष संपल्यानंतर उशीराने म्हणजे अगदी दोन ते तीन महिन्यानंतर पोर्टलवर (संकेतस्थळावर) उपलब्ध करुन देता तर मग यासाठी तुम्हाला कोण दंड लावणार? म्हणजे आमच्याकडुन उशीर झाला तर दंड व विलंब शुल्क आणि तुम्ही उशीर केला तर काहीच नाही हा एक प्रकारे अन्यायच म्हणावा लागेल. जी.एस.टी. सारख्या किचकट कायद्याच्या तरतुदींचे पालन करुन मासिक तसेच वार्षिक विवरणपत्र भरणे, सदर कायद्याअंतर्गत त्याचे सन 2018-2019 चे ऑडीट करणे, तसेच आयकर कायद्यान्वये वार्षिक विवरणपत्र भरणे व त्याचे ऑडीट करणे हे सगळे अशा कोरोनाकाळात व एवढ्या कमी वेळेत पुर्ण करण्याची अपेक्षा तुम्ही आमच्याकडुन ठेवता हे जरा अतीच होतयं. अशी ही अस्थिर करपध्दती आमच्यावर थोपवता थोपवता आपणच अस्थिर झाला आहात. आम्हाला मान्य आहे देशाच्या प्रगतीसाठी अर्थार्जन जरुरी आहे परंतु, सामान्य व्यापार्‍यांना मानसिक त्रास देऊन कर गोळा करण्याची आपली पध्दती मात्र साफ चुकीची आहे. तुम्हाला कर पाहीजे आहे तर तो अ‍ॅडव्हान्समध्ये घ्या परंतु वेगवेगळया माहीत्या व पत्रकांचे प्रमाण कमी करुन त्याची पुर्तता करण्यासाठी आम्हाला वेळ द्या आणि आमची मानसिक हेळसांड व त्रास थांबवा. आपण जाणकार आहात आमचे म्हणणे तुम्ही जाणता आमच्या त्रासाचे निरसनही तुम्ही करू शकता आपणास याची जाणीव व्हावी म्हणुन आम्ही सर्व मिळुन आपले अशा प्रकारचे चुकीचे धोरण बदलण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू. – अ‍ॅड. निलेश एस. चोरबेले (टॅक्स अ‍ॅडव्होकेटस), अहमदनगर. मो.9890949495

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा