शहरातील रस्त्यांवर पाणी टाकल्यास दंडासह फौजदारी गुन्हे दाखल होणार-महानगरपालिका प्रशासनाचा इशारा

अहमदनगर- शहरामध्ये नवीन केलेले डांबरी रस्ते, दुरुस्ती, पॅचींग इत्यादींवर नागरिकांनी पाणी टाकल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा महापालिकेने दिला आहे. याबाबत महापालिकेने शहरातील सर्व नागरीकांना आवाहन केले असून त्यामध्ये म्हंटले आहे की, गेल्या दोन महिन्यापासून शहरातील विविध मुख्य रस्त्यांची दुरूस्ती, पॅचींग तसेच अनेक ठिकाणी नवीन डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत.

सदर कामे करण्यापूर्वी, चालू असताना व पूर्ण झाल्यानंतर वेळोवेळी भेटी दिल्या असता असे निदर्शनास येते की, नागरीक त्यांचे निवासी व व्यावसायीक आस्थापना स्वच्छ केल्यानंतर, धुतल्यानंतर परिसर स्वच्छ केल्यानंतर ते पाणी थेट रस्त्यावर निष्काळजीपणे सोडले जाते. रस्ते दुरुस्तीचे पॅचींग करताना डांबर, खडी टाकून रोलींग केल्यानंतर काही तासातच नागरीकांनी कुठलाही विचार न करता पाणी सोडले जाते. पाणी आणि डांबर यांचे तांत्रिकदृष्ट्या वितुष्ट असून नवीन, ताज्या केलेल्या डांबराच्या पायामध्ये पाणी गेल्यास खडी रस्ता सोडून देते व केलेले काम रस्ते उखडले जातात व त्यामुळे जनतेच्या, मनपाच्या पैशाचा अपव्यय होतो तसेच नागरीकांच्या व पदाधिकार्‍यांच्या रोषास सामोरे जावे लागते.

सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांमध्ये वरील बाबी आढळून आल्यामुळे गुलमोहर रोड परिसर, शहर गावठाण परिसर या भागातील नागरीकांना यापुर्वी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. तरीही नागरीकांमध्ये जागरुकता व्हावी याकरीता नागरीकांना डांबरी रस्त्यावर व इतर कोणत्याही रस्त्यावर पाणी सोडल्यापासून प्रतिबंध करणे व यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना व पादचार्‍यांना त्रास होतो तसेच रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांमुळे तेथून जाणार्‍या नागरीकांच्या अंगावर पाणी उडते ही बाब योग्य नाही तसेच यापुढे असे कृत्य करणार्‍या नागरीकांकडून मनपाचे झालेले नुकसान दंडात्मक कार्यवाही करून वसुल करण्यात येईल. याउपरही सुधारणा न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणेत येतील याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा