श्रद्धा ही जीवनातील फार मोठी शक्ती आहे कारण श्रद्धा हे प्रीतीचेच विशाल रूप आहे. प्रीती ही चिमणीसारखे असते. आपले छोटे घरटे नीटनेटके, उबदार ठेवण्यात व आपल्या पिलांना सांभाळण्यात ती गुंग होऊन जाते. याउलट श्रद्धा ही चंडोल पक्षासारखी आहे. चंडोलाचे घरटे पृथ्वीवर असले तरी प्रातःकाल होताच गात गात प्रकाशाचे स्वागत करीत तो उंच उंच जातो. श्रद्धेची विशालता जेव्हा पराकोटीला पोहोचते तेव्हा या चंडोलाचे गरूडात रुपांतर होते. मग स्वर्गातले अमृत पृथ्वीवर आणण्याच्या इर्षेने ती श्रद्धा संचार करू लागते. श्रद्धेच्या बळावर मनुष्य विशेष कार्य करू शकेल असे नाही पण श्रद्धेवाचून त्याला काहीच करता येणार नाही.