आर्थिक अपहारातील आरोपींच्या अटकेसाठी प्रवरा पतसंस्था ठेवीदारांचे पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरु

(छाया – बबलू शेख,नगर)

अहमदनगर – येथील रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा पतसंस्थेच्या आर्थिक अपहार प्रकरणातील सर्व 30 आरोपींना अद्याप अटक न केल्यामुळे ठेवीदारांना त्यांची रक्कम सहव्याज मिळालेली नाही. या आरोपींना अटक करून एकूण मुदत ठेव रक्कम मिळावी, या मागणीसाठी प्रवरा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आज (दि. 13) एकदिवसीय आंशिक उपोषण केले. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपाधीक्षक श्रीमती सोनवणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या उपोषणात इस्माईल गुलाब शेख यांच्यासह हेमंत सुखदेव बिर्‍हाडे, किसन गोपीनाथ शिंदे, दिलीप श्रीकृष्ण निसळ, रामकृष्ण नामदेव परदेशी, टी. ई. भंडारे, एस. जठार, पी. पी. काळे, गणेश रामचंद्र गुप्ता, सर्जेराव गागरे, फरहत शेख, प्रमोद खरमाळे व इतर ठेवीदार बसले आहेत.

प्रवरा पतसंस्थेत 5 ते 6 कोटी रुपयांचा अपहार झालेला असून यात एकूण 30 आरोपी आहेत. याबाबत एमपीआयडी अंतर्गत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन 6 महिने झाली तरी अद्याप एकाही आरोपीला अटक नाही. या आरोपींचे राजकीय हितसंबंध आहेत. तसेच पैशाच्या व गुंडांच्या जोरावर ते नगर शहरात खुलेआमपणे फिरत असून सदर गुन्ह्यातील साक्षीदार व पुरावे नष्ट करत आहेत. संबंधित पोलिस अधिकारी हे आरोपींच्या राजकीय हितसंबंधाच्या दबावाखाली असल्यामुळे आरोपींना अटक करत नाहीत. त्यामुळे ठेवीदारांना त्यांची एकूण मुदत ठेव रक्कम सहव्याज अद्याप मिळालेली नाही. या ठेवीदारांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच काही ठेवीदार मानसिक त्रासामुळे मयत झालेले आहेत. त्यास सदर आरोपी जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे फिर्यादीलाही मानसिक त्रासामुळे कॅन्सरचा गंभीर आजार झालेला असून त्यांना ऑपरेशनकरिता त्यांच्या मुदत ठेव रकमेची अत्यंत आवश्यकता आहे. तरी या भामट्या संचालकांना अटक झालीच पाहिजे. सदर संस्थेच्या आणि संचालकांच्या मालमत्ता तत्काळ जप्त करून आणि तत्काळ लिलाव करून ठेवींची रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा