राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचे शहरात धरणे

अहमदनगर- नव्याने पारीत करण्यात आलेल्या तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या प्रदीर्घ आंदोलनाची दखल सरकार घेत नसल्याच्या निषेधार्थ शहरातील मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करुन नव्याने पारीत करण्यात आलेले शेतकरी विरोधी तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सत्ताधारी भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील, ह.भ.प. भगवान शास्री घुगे, हरजितसिंह वधवा, राजू मदान, संजय सावंत, गणेश चव्हाण, शिवाजी भोसले, संजय संसारे, भारतीय बौध्द महासभेचे संजय कांबळे, अण्णा गायकवाड, सतीश बोरुडे, शाहरुख शेख, दत्ता सावंत, संतोष सावंत, सुदाम सावंत, लक्ष्मण सावंत, अमर सातुरे आदी सहभागी झाले होते. बाळासाहेब मिसाळ पाटील म्हणाले की, भाजप आणि संघ परिवार दिल्लीच्या आंदोलना विषयी गंभीर नाहीत. शेतकरी दिल्ली येथील थंडीच्या कडाक्यात आंदोलन करीत आहे. तर आंदोलन दडपण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले जात आहे. दीड महिना उलटून देखील केंद्र सरकार आपली अडमुठी भूमिका सोडण्यास तयार नाही. सरकार केवळ चर्चेच्या फेर्‍या घडवून आणत आहेत.

शेतकरी कायदा मागे घ्यावा ही प्रमुख मागण्या असताना सरकार मागे हटायला तयार नाही. सरकारने हे आंदोलन केवळ पंजाब, हरियाणाच्या शेतकर्‍यांचे आंदोलन असल्यचे चित्र निर्माण करण्याचे काम केले. मात्र या आंदोलनात संपुण देशातील शेतकरी उतरले आहेत. महाराष्ट्रातून देखील अनेक शेतकरी या आंदोलनासाठी दिल्लीला गेले आहेत. हा कायदा रद्द झाला तर देशभरातील सर्व शेतकर्‍यांचा फायदा होणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. हरजितसिंह वधवा यांनी या धरणे आंदोलनास पाठिंबा देऊन दिल्लीतील भूमीपुत्रांच्या आंदोलनास खलिस्तानी आतंकवादी म्हणून संबोधने हे शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. अशा चुकीच्या प्रचाराने शीख, पंजाबी समाजाच्या भावना देखील दुखावल्या आहेत. सर्वसामान्य शेतकर्‍यांचे हे आंदोलन असून, सरकारने त्यांची दखल घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाची केंद्र सरकार दखल घेत नसल्याने या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी संपुर्ण देशात राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रविवार दि.17 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा