सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर शेतकरी संरक्षण कायद्याचा प्रस्ताव मांडणार-कृषी कायद्यांना स्थगिती देणार्‍या निर्णयाचे स्वागत

अहमदनगर- शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल न घेणार्‍या केंद्रातील भाजप सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच मंजूर करण्यात आलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांना स्थगिती देऊन झटका दिला आहे. पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीत नगरचे अनिल घनवट यांची नियुक्ती केली असून, त्यांच्या माध्यमातून देशात शेतकरी संरक्षण कायदा आणण्याची मागणी समिती समोर मांडण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याची समीक्षा करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

समितीत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकरी नेत्याला या समितीत स्थान मिळाल्याने शेतकर्‍यांचे प्रमुख प्रश्न त्यांच्यासमोर मांडून देशात शेतकरी संरक्षण कायद्याची गरज असल्याचा प्रस्ताव देखील त्यांच्या समोर संघटनेच्यावतीने मांडण्यात येणार आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाशी सुसंगत बाजारभाव मिळावा, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शेतकरी संरक्षण कायद्यात समाविष्ट असण्याची प्रमुख मागणी देखील करण्यात येणार असल्याचे संघटनांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीतील आंदोलक शेतकर्‍यांना शेवटपर्यंत केंद्रातील भाजप सरकारने न्याय दिला नाही.

शेवटी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयास हस्तक्षेप करावा लागला आहे. नवीन कृषी कायद्यांचा प्रश्न केंद्र सरकारने सहानुभूतीपुर्वक सोडवण्याची गरज होती. सरकारने शेतकर्‍यांचे खरे प्रश्न समजावून घेऊन देशात शेतकरी संरक्षण कायदा अस्तित्वात आणण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हटले. शेतकरी बांधवांच्या आत्महत्या थांबून, त्यांचा विकास साधण्यासाठी देशात शेतकरी संरक्षण कायदा आणण्यास संघटनेचे अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, प्रकाश थोरात, वीरबहादूर प्रजापती, कॉ.बाबा आरगडे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा