नगरच्या तिघांनी सर केला आव्हानात्मक लिंगाणा किल्ला

अहमदनगर- गिर्यारोहणाची आवड असलेल्यांसाठी अतिशय आव्हानात्मक असलेला पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील लिंगाच्या आकाराचा अभेद्य असा लिंगाणा किल्ला सर करण्याची कामगिरी नगरमधील तिघा युवकांनी केली आहे. इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या माध्यमातून अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या अजय गांधी, देवेंद्र वैद्य, भागवत अधापुरे यांनी 2969 फूट उंचीवरील हा किल्ला सर करून तिथे भगवा झेंडा रोवला. चढाईसाठी अतिशय कठिण असलेला लिंगाणा सर करताना शारीरीक व मानसिक क्षमतेची कसोटी लागते.

नव्या वर्षाची सुरुवात या अवघड ट्रेकिंगने करून तिघांनीही नगरची मान उंचावली आहे. पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील लिंगाच्या आकाराचा अभेद्य असा किल्ला म्हणजे हिंदवी स्वराज्यातला लिंगाणा किल्ला होय. मोहरी या गावातून किल्ल्याकडे जाण्याची वाट असून संपूर्ण चढण 4 मैल लांबीची आहे. लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायची वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येतं. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ 3-4 तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे.

नगरच्या तिघांनीही ही चढाई अतिशय कौशल्याने केली. किल्ल्यावर पोहचल्यानंतर सर्व श्रम, कष्ट सार्थकी लागल्याची भावना दाटून आल्याची प्रतिक्रिया या तिघांनी दिली. अजय गांधी यांच्यासह देवेंद्र वैद्य, भागवत अधापुरे यांना सुरुवातीपासून ट्रेकिंगची आवड असून सह्याद्रीच्या डोंगररांगात त्यांची नेहमी भटकंती चालू असते. अजय गांधी हे नगरमधील जय आनंद महावीर युवक मंडळाचे सदस्य असून या कामगिरीबद्दल त्यांचे मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सेक्रेटरी हेमंत मुथा, महिलाध्यक्षा स्वाती चंगेडिया, सेक्रेटरी सोना डागा यांच्यासह सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा