दिव्यांग वकिलाला बेदम मारहाण करत त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केडगाव येथील घटना, 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर- दिव्यांग वकिलास शिवीगाळ तसेच बेदम मारहाण करत त्याच्या अपहरणाचा प्रयत्न करण्याचा खळबळ जनक प्रकार केडगाव परिसरात घडला. या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून सदर वकिलाने कोतवाली पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली असून या फिर्यादीवरुन 10 ते 12 जणांविरुद्ध मारहाणीचा व अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अंबिकाप्रसाद शंकरलाल क्षीरसागर (वय 54, रा.शाहूनगर बस स्टॉप जवळ, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या 4-5 वर्षांपासून विकास बापू लोखंडे याची केस आपल्याकडे आहे. या केस मधील प्रतिस्पर्धी असलेली सोनाली विकास लोखंडे व तिची आजी आल्हाट (पूर्ण नाव माहित नाही) आणि इतर नातेवाईक हे गेल्या 6 डिसेंबर पासून मोबाईलवर फोन करुन दमदाटी करत आहेत. ‘विकास लोखंडे यास आमच्यापुढे हजर कर नाही तर तुझे हातपाय तोडू, आधीच तू अपंग आहे, तुझे पायही तोडून टाकू’, अशा धमक्या देत आहेत.

शनिवारी (दि.9) दिनकर सकट याच्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये चर्चा करत असताना सोनालीचा भाऊ तेथे आला व त्याने ‘विकास यास हजर करा केस मिटवून घेवू’, असे सांगितले. त्यानंतर सोमवारी (दि.11) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास माजी पक्षकार दिनकर सकट यांनी नगर-पुणे महामार्गालगत असलेल्या परफेक्ट टायरच्या शो-रुम जवळील झेरॉक्स दुकानात बोलावून घेतले त्यानंतर तेथे सोनाली लोखंडे तिची आजी, तिचा मामा, तिचा भाऊ तसेच अनोळखी 7 ते 8 इसम तेथे आले व त्यांनी आपणास शिवीगाळ केली. कपडे ओढत धक्काबुक्की करुन मारहाण केली. तसेच आपणास उचलून पॅगो रिक्षात टाकून तेथून घेऊन जावू लागले. यावेळी दिनकर सकट यांनी आपणास त्यांच्या पासून सोडवत त्यांच्या गाडीवर कोतवाली पोलिस ठाण्यात आणले. या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी सोनाली लोखंडे (रा.संदीप हॉटेल समोर, केडगाव), तिची आजी, भाऊ, मामा (पूर्ण नाव माहित नाही) तसेच अनोळखी 7 ते 8 इसमांविरुद्ध भा.दं.वि.क. 365, 143, 147, 149, 323, 504, 506, 507 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा