स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य देशातील आपल्या जीवनकार्याचा प्रारंभ अमेरिकेतील सर्वधर्मपरिषदेत अखिल विश्वाला स्तिमीत करणार्या संबोधनाने केला. या एकाच घटनेने भारतभूच्या गेलेल्या आत्मसन्मानाची, महान गौरवाची, सांस्कृतिक-आध्यात्मिक अन् शाश्वत ध्येयाची दृढ पुनर्स्थापना झाली. पश्चिम दिग्विजय करून परत आल्यावर त्यांनी भारतीयांना महान संदेश दिला की, “उठा, जागे व्हा, आणि ध्येयप्राप्तीविना थांबू नका.” (सुदैवाने अशाच विचारधारेला देशात व नेतृत्वात गांभीर्याने घेतले जात आहे.) स्वामींनी विशेषतः युवकांना सांगितलंय की तुम्हाला मरायचंच असेल तर भव्य, मोठ्या उद्दिष्टांकरिता जगा आणि मरा. स्वामी विवेकानंद जयंती अन् युवा दिनानिमित्त सर्वांना शुभकामना.