नगर शहरातील 50 टक्के जाहिरात फलक अनधिकृत-नेहरु पुतळ्यासमोरील कारवाईवेळी निदर्शनास आली बाब; महापालिका करणार कारवाई – उपायुक्तांची माहिती

अहमदनगर- शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज तसेच विविध जाहिरात फलक लावण्यात आलेले आहेत. यापैकी तब्बल 50 टक्के होर्डिंग्ज आणि जाहिरात फलक हे अनधिकृत असण्याची शक्यता असल्याने सर्व होर्डिंग्ज, जाहिरात फलकांची माहिती मागविण्यात आली आहे. सदर माहिती उपलब्ध झाल्यानंतर अनधिकृत होर्डिंग्ज आणि जाहिरात फलकासंदर्भात महापालिकेच्यावतीने दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त संतोष लांडगे यांनी दिली आहे. लालटाकी येथील पंडित नेहरू यांच्या पुतळ्यासमोरील होर्डिंग्ज हटविण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने दोन दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनाची दखल घेत महापालिकेचे उपायुक्त प्रदीप पठारे आणि उपायुक्त संतोष लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पं. नेहरू पुतळ्यासमोरील होर्डिंग्ज हटविण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी तेथील चार होर्डिंग्ज व जाहिरात फलकापैकी दोन फलक हे अनधिकृत असल्याची बाब उपायुक्त पठारे व लांडगे यांच्या निदर्शनास आली. त्यावर प्रतिक्रिया देताना शहरातील 50 टक्के होर्डिंग्ज आणि जाहिरात फलक अनधिकृत असण्याची शक्यता उपायुक्त लांडगे यांनी व्यक्त केली. महापालिकेचे जाहिरात विभागाचे अधिकारी देशमुख यांची यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश आपण यापूर्वी दिले होते. परंतु तत्कालीन आयुक्तांनी त्यास मंजुरी दिली नाही. अशा अनधिकृत जाहिरात फलकांमुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट होत आहे. त्यामुळे अशा सर्व होर्डिंग्ज आणि जाहिरात फलकांची माहिती आता मागविण्यात आली असून, अधिकृत फलकांसंदर्भात दंडात्मक कारवाईबरोबरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त लांडगे यांनी सांगितले.

सावेडी प्रभाग कार्यालयात 35 पैकी 22 कर्मचारी गैरहजर उपायुक्त लांडगे यांनी सोमवारी (दि. 11) सकाळी अचानक सावेडी प्रभाग कार्यालयास भेट दिली. यावेळी कार्यालयातील उपस्थिती पाहून उपायुक्तही अवाक् झाले. कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 9.45 वा. सुरू होते. कार्यालयात सकाळी 35 कर्मचार्‍यांपैकी तब्बल 22 कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले आहेत. या सर्व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीसंदर्भात मनपा आयुक्तांना अहवाल देण्यात येणार असून, त्यांच्या सूचनेनुसार संबंधित गैरहजर कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त लांडगे यांनी दिली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा