नगरच्या बाह्यवळण रस्त्यावर वाहन चालकांना लुटणारी टोळी सक्रीय

अहमदनगर- नगरच्या बाह्यवळण रस्त्यावर एकाच दिवशी दोन ट्रक चालकांना धमकावून लुटण्या बरोबरच एकाची इंडिका कार पळवून नेण्याच्या घटना शुक्रवारी (दि.8) पहाटे तसेच सकाळच्या सुमारास घडली आहे. बाह्यवळण रस्त्यावर अशा पद्धतीने लुटमारीच्या घटना घडू लागल्याने वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

नगर शहरातून विविध राष्ट्रीय तसेच राज्य महामार्ग जात आहेत. या महामार्गांवरील अवजड वाहनांचा ताण शहरावर पडत असल्याने काही वर्षापुर्वी शहरा बाहेरुन बाह्यवळण रस्ता करण्यात आलेला आहे. त्यामुळे अवजड वाहतूक या रस्त्यावरुन वळविण्यात आलेली आहे. अनेक लांब पल्ल्याची वाहने या बाह्यवळण रस्त्यावरुन दिवस-रात्र धावत असतात. या परप्रांतीय वाहन चालकांना लुटण्याच्या घटना आता बाह्यवळण रस्त्यावर वाढू लागल्या आहेत. शुक्रवारी (दि.8) पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास बारामती येथील मालट्रक चालक असिम पीर बाबालाल मुल्ला हे त्यांची मालट्रक (क्र.एम.एच.04, एफ.पी.1865) घेऊन बाह्यवळण रस्त्याने जात असताना निंबळक ते केडगाव बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात दोन व्यक्तींनी मालट्रक अडवली. एकाने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने ट्रकच्या पुढील काचेवर फटका मारुन काच फोडली तर त्याच्या सोबतच्या दुसर्‍या इसमाने ट्रक चालक हातातील पाकीट, ड्रायव्हिंग लायसन, आधारकार्ड आदी कागदपत्रे हिसकावून नेले. या पाकीटात 4 हजार 500 रुपयांची रोकड होती. तसेच ट्रकचालक असिम मुल्ला याचाच सहकारी रवींद्र मारुती खराडे हा दुसरी मालट्रक (क्र.एम. एच.43, वाय.0236) चालवत होता. त्याची ट्रक अडवून त्यालाही दमबाजी करत त्याच्या जवळील 3 हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेली. याप्रकरणी असिम मुल्ला याच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं. वि.क. 392, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याच बाह्यवळण रस्त्यावर निंबळक शिवारात निखिल मधुकर राठोड (वय 23, रा.औंढा नागनाथ, जि.हिंगोली) हा त्याच्या मित्रासमवेत टाटा इंडिगो कारने (क्र.एम.एच.43, एन.6219) जात असताना शुक्रवारी (दि.8) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पाऊस येत असल्याने ते गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून उभे होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात चार इसमांनी त्यांना दमदाटी करुन इंडिगो कार पळवून नेली. या कारमध्ये 2 मोबाईलही होते. या प्रकरणी निखील राठोड यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क.323, 392 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.बाह्यवळण रस्त्यावर एकाच दिवशी रस्तालुटीच्या 3 घटना घडल्याने या रस्त्यावर वाहन चालकांना लुटणारी टोळी सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या टोळीचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी केली जात आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा