अहमदनगर- नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात हॉटेल कृष्णाईवर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकून अवैधरित्या विक्री करण्यात येत असलेला देशी-विदेशी दारुचा साठा पकडला आहे. साहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. चास शिवारातील हॉटेल कृष्णाई येथे हॉटेल चालक संजय उर्फ सोनू मारुती कारले हा बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स.पो.नि. राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी (दि.8) रात्री 8.30 च्या सुमारास कृष्णाई हॉटेलवर छापा टाकला असता तेथे 36 हजार 312 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपी संजय कारले विरुद्ध अवैध दारुविक्री कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.