नगर जिल्ह्यातील खराब रस्ते देत आहेत अपघातांना निमंत्रण-चार तासात झाले चार अपघात; एकाचा बळी तर 5 ते 6 जण जखमी; अपघातांची मालिका सुरुच

अहमदनगर- नगर शहर परिसरातून जाणार्‍या विविध राष्ट्रीय मार्ग, राज्य मार्गांची खड्ड्यांमुळे प्रचंड दुर्दशा झालेली असून रस्त्यांवरील खड्डे चुकविताना वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. नगर जवळच गुरुवारी (दि.7) सायंकाळी अवघ्या 4 तासात 4 वेगवेगळे अपघात झाले असून त्यात एका युवकाचा बळी गेला आहे तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. अपघातात वाहनांचे झालेले नुकसान तर वेगळेच आहे. नगर शहर परिसरातून विविध महामार्ग जात आहेत. त्यातील बहुतांशी महामार्गांचे प्रचंड दुरावस्था झालेली आहे. त्यात नगरसोलापूर महामार्ग, नगर-जामखेड महामार्ग व नगर-पाथर्डी हा कल्याण-विशाखा पट्टणम् राष्ट्रीय महामार्ग असलेल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे मोठी दुर्दशा झालेली आहे.

मोठमोठाले खड्डे पडलेले असल्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनांचे अपघात घडत आहेत. या अपघतात जिवितहानीसह वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्य शासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र नागरिकांच्या जिवीताचे काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. या खड्ड्यांमुळे काल गुरुवारी (दि.7) दुपारी 4 ते रात्री 8 या कालावधीत नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार वेगवेगळे अपघात झाले आहेत. त्यातील दोन नगर-जामखेड रोडवर टाकळी काझी शिवारात तर दोन अपघात नगर-पाथर्डी रोडवर चांदबिबी महालाच्या घाटात झाले आहेत.

टँकरच्या धडकेत युवकाचा मृत्यू

नगर-पाथर्डी रोडवर चाँदबिबी महालाजवळील घाटात गुरुवारी (दि.7) दुपारी 4 च्या सुमारास भरधाव वेगातील टँकरने (क्र.एम. एच.12, आर.एन.5796) मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने निखिल भारत मुळे (वय 19, रा.ढोरगाव, ता.माजलगाव, जि.बीड) हा युवक ठार झाला आहे. अपघातानंतर टँकर चालक पसार झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच परिसरात दुसरा अपघात मालट्रक व पिक-अप व्हॅन यांच्यामध्ये झाला असून या अपघातात पिक-अप मधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारच्या धडकेत चौघे जखमी

नगर-जामखेड रोडवर टाकळी काझी गावाजवळ रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात कारची मोटारसायकलला जोराची धडक बसली.या अपघातात जामखेड येथील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर रेडेकर, त्यांची पत्नी व दोन मुले असे चौघेजण जखमी झाले असून त्यांना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. हा अपघात सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडला. अपघातात कारचालकही जखमी झाला आहे. या अपघाताची नगर तालुका पोलिस ठाण्यात दवाखान्यातून नोंद आली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते.

मनसेचे पदाधिकारी बालंबार बचावले

नगर-जामखेड रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा झालेली असून या खराब रस्त्याचा फटका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारनेर येथील पदाधिकार्‍यांनाही बसला आहे. पारनेरचे मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, पारनेर शहराध्यक्ष वसिम राजे, संदीप नगरे हे चिचोंडी पाटील कडून नगरच्या दिशेने येत असताना कोल्हेवाडी फाट्याजवळ नगरहून जामखेडच्या दिशेने खड्डे चुकवीत चाललेल्या स्विफ्ट डिझायर कारला वाचविण्याच्या नादात मनसे पदाधिकार्‍यांची फॉर्च्युनर गाडी चालकाने रस्त्याच्या कडेला घेतली असता ती झाडावर आदळून रस्त्याच्या खाली कोसळली. या अपघातात मनसेचे सर्व पदाधिकारी बालंबार बचावले आहेत. मात्र त्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा