वार्षिक भविष्य 2021

आपणा सर्वांना हे नवीन वर्ष-सन-2021 सुखसमृद्धीचे, भरभराटीचे, ऐश्वर्य संपन्न व आपल्या मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण सर्व वाचक दरवर्षी जसा प्रतिसाद देत आला आहात, तसा प्रतिसाद याही वर्षी आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

मार्च- 2020 पासून कोरोना महामारीने सर्व जगातील कामकाज थांबवले, आता ही थांबलेली चाके सुरु होईपर्यंत सर्वांना धाकधूकच राहील. या महामारीने सर्व चाके थांबू शकतील असे आजपर्यंत कोणत्याही ज्योतिषाने सांगितले नव्हते. म्हणजेच आपणा सर्वांना न जाणत्या ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे गरजेचे आहे. कोरोना महामारीत आपण सामाजिक-कौटुंबिक-आर्थिक असे अनेक नियम शिकलो कि ज्यामुळे आपल्या जीवनाला एक प्रकारची शिस्त आली. यामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. अनेकजण बेरोजगार झाले. रोजंदारीवर काम करणार्‍या घटकांचे आर्थिक कंबरडे मोडले. परंतु, हे होत असताना आपल्यावर पूर्वजांनी जे अनेक उपकार केले आहेत, त्या घटकाचे आधार घेऊन समाजातील काही घटकांनी मार्ग काढला. अर्थातच हा मार्ग म्हणजे आपल्या जन्मकुंडली आधार घेऊन आपल्या कुटुबांची दिशा ठरविणे. यामुळे नैराश्य कमी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

शेवटी कोणतेही शास्त्र हे परिपूर्ण नसते. त्याला सुद्धा मर्यादा असतातच आणि ज्योतिषशास्त्र सुद्धा याला अपवाद नाही. परंतु ज्यांचा या शास्त्रावर विश्वास आहे त्यांनी आपल्या पूर्व कर्मावर विश्वास ठेवाव्यात पाहिजे. आणि प्रत्येकाचे नशीब म्हणजेच स्वतःचे (1) पूर्व संचित (2) आई वडिलांचे कर्म (3) आपल्या पिढीतील पूर्वजांचे कर्म यानुसार आपले जीवन घडत असते. पुन्हा आपल्या स्वकर्माचे एकूण तीन भाग पडतात. 1. संचित 2. प्रारब्ध 3. क्रियामण आणि या तीन कर्मानुसार आपल्या जीवनाला सद्य स्थिती प्राप्त होते व त्यानुसारच आपले भविष्य घडत असते. सध्याचा स्थितीचा विचार करता, ’माणंस’ हीच एक ग्रह आहेत कि, जी पैशासाठी एकमेकांचा काटा काढण्यास मागे पुढे पाहत नाहीत. पैसा, प्रतिष्ठा, जमीन-प्लॉट-फ्लॅट खरेदी-विक्री, यश-अपयश, तोटा, अपमान, परस्त्री या चिखलामध्ये लोळणार्‍या जीवांच भविष्य पाहणं, ज्योतिष पाहणं हे ज्योतिष शास्त्रच उद्दिष्ट नाही. तर ज्योतिषशास्त्र हे एक विशिष्ट चिंतन आहे.

आपल्या जीवनातील माधुर्य आहे व शिवाय एक प्रकारचे नैराश्य घालावणारे ’आध्यात्म’ आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. पण याचा उपयोग समाजाला लुबाडण्यासाठी करायचा नसतो आणि नेमकं हेच आपण विसरलोय! आणि त्यामुळे या अप्रमाणिक किंवा भेसळीच्या जगात आपल्या अंतरमनावर खूप धूळ साचली आहे. शेवटी प्रत्येक मनुष्याची पत्रिका एक डबकं आहे आणि या डबक्यात असलेला माणूस बेडका सारखा आहे. डबक्यातील बेडूक जसा डबक्यातील पाणी आटणार नाही असं म्हणतो आणि मोठ्या सागराची भाषा बोलयला तयार होत नाही. अगदी तसेच प्रत्येकाने महासागरमध्ये झोकून देऊन पोहायला शिकल पाहिजे. तटबंदी तोडावयास हवी. उपाय, तोडगे, रत्न. यांचा अती बाजार झाल्यामुळे आंतरिक शुद्धतेला थारा न देता पैशाच्या माध्यमातून येणार्‍या बाह्यशुद्धीला अशाप्रकारचे अध्यात्म किंमत देत नाही.

शेवटी, आपल्या प्रत्येकालाच आपल्या जीवनात काय घडणार आहे याची उत्सुकता अगदी प्रत्येकालाच असते कारण जीवघेणी स्पर्धा, मोडकळीस आलेली कुटुंब अवस्था, विवाह ठरण्यामध्ये येणार्‍या आज काल प्रचंड अडचणी, नवविवाहितांचे होणारे ताबडतोब घटस्फोट व प्रत्येकाच्या जीवनात आलेला एकाकीपणा यामुळे समाजाचा ओढा ज्योतिषाकडे वाढला आहे. तेव्हा याच्या फार आहारी न जाता उपासनांची जोड दिली तर प्रत्येकाला आपल्या जीवनात नक्कीच यश मिळेल. रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे- ‘उपासनेला दृढ चालवावे भूदेव संताशी सदा नमावे.’ अतिसावधानतेचा इशारा – ज्या व्यक्तीचे उत्तराआषाढा नक्षत्र चरण 2 व 3 आहे किंवा ज्यांची जन्मतारीख 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आहे त्या व्यक्तींनी पुढील बाबतीत सावधानता बाळगावी या कालावधीमध्ये आपल्याला एक प्रकारचे नैराश्य जाणवणार आहे. सतत आपल्या मनाविरुद्ध घटना घडणार आहे. त्यामुळे मानसिक शांतता बाळगावी.

आपण कोणत्याही प्रकारचा सात्विक संताप करून घेऊ नये. सात्विक संताप करून घेतल्यास आपल्यालाच त्याचा त्रास होणार आहे. कोणतेही नियम/कायदा मोडू नये. आपला पाल्य इ. 10वी/इ. 12वी ला असेल तर त्याचा पूर्ण वर्तवणूकीवर लक्ष ठेवावे. आपल्या पाल्याचा असंगाशी-संग होऊ शकतो. अभ्यासावरील लक्ष कमी होण्याची शक्यता तेव्हा त्याला आपणच मानसिक आधार द्यावा. नोकरदारांनी वरिष्ठांपासून सावध राहावे. व्यावसायिकांनी अत्यंत अभ्यास करून काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. विवाह ठरविणे/ प्रॉपर्टी खरेदी विक्री यासाठी अत्यंत काळजीपूर्वक व्यवहार करावेत. जुने आजार असतील तर ऑपरेशनचे योग येऊ शकतात किंवा अचानक एखादा आजार उद्भवू शकतो व त्याचे निदान डॉक्टरांना सुद्धा व्यवस्थित समजू शकणार नाही. कोर्ट-कचेरी अचानकपणे उद्भवू शकते. या काळात कोणालाही जामीन राहू नये. हात-उसने पैसे देऊ नयेत. तसेच ज्यांची कर्क-मकर-धनु-कुंभ रास आहे त्यांना हा धोक्याचा इशारा आहे. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी या काळात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे व मानसिक ताण आपल्यापासून दूर ठेवावेत. तसेच या कालखंडात नवविवाहितांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे एकमेकाला सांभाळून घेणे केव्हाही चांगेल. परंतु लगेचच टोकाची भूमिका घेऊ नये. तसेच वाहन चालविताना अत्यंत सावकाश चालवावे. वाहतुकीचे नियम पालन करावे. उपासना-: प्रत्येक व्यक्तीला वाटते की, आपला भाग्योदय व्हावा. आपल्यावर येणारी संकटे दूर व्हावीत व मनःशांती मिळून जास्तीत जास्त अर्थार्जन व्हावे. तेव्हा या वर्षी आपण उपासना देताना एक राशीची तर दुसरी उपासना भाग्योदयाशी निगडीत दिली आहे. व आपले मानवी जीवन सार्थकी लागेल.

1. मेष- नोकरी व्यवसायात यश आपली राशीचक्रातील पहिली रास. कितीही अडचणी आल्या तरी जीवनाशी टक्कर देत पुढे जाणे हा आपला गुणधर्म आपल्या राशीचे बोधचिन्हे मेंढा. मेंढ्याचे वैशिष्ट्य असेकी, राग आला तर स्वतः चे डोके फोडून घेणार. परंतु या वर्षात आपल्याला अजिबात डोके फोडून घेण्याची आवश्यकता नाही. आपल्याला नोकरी-व्यवसायात अडचणी येणार नाहीत तर नवनवीन कल्पना साकार होतील त्याला मूर्त रूप देता येईल. नवीन व्यवसाय करण्यासाठी हा काळ योग्य आहे. नोकरदारांना यावर्षात प्रमोशन मिळेल. राजकारणी व कलावंत यांना हा काळ खूपच अनुकूळ आहे. विशेषतः शेतकर्‍यांना सुद्धा हे वर्ष चांगले जाईल अविवाहितांचे विवाह ठरतील. त्यांचे निर्णय योग्य राहतील. ज्यांचे पाल्य इ 10वी/इ 12वी ला असतील त्यांनी घेतलेल्या साईड अचूक असतील. परदेशी शिक्षणासाठी जाणार असाल तर त्यांना त्यामध्ये यश येईल. सार्वजनीक ठिकाणी आपल्या शब्दाला किंमत राहील. या वर्षासाठी हा काळ आपणासाठी अविस्मरणीय आहे. तेव्हा जास्तीतजास्त या संधीचा उपयोग घ्या. जानेवारी/फेब्रुवारी 21 – अचानक एखादा खर्च उद्भवू शकतो. अनपेक्षित आरोग्याची अडचण येऊ शकते. मार्च/एप्रिल – अनपेक्षितपणे आपल्या वडिलांच्या नात्यातील एखाद्या आत्या किंवा काकुंशी संबंध येईल. त्यांच्या सल्ल्याचा फायदा होईल. तसेच या महिन्यात परदेशी जाण्याचा प्रयत्न करीत असाल तर त्यात निश्चित यश येईल. मे/जून – स्थावर इस्टेटीचे कामे थोडी कटकटीने मार्गी लागतील परंतु फक्त त्यासाठी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. जुलै/ ऑगस्ट – संततीविषयक समस्या मिटतील. त्यांची या महिन्यात पूर्ण लाईन लागलेली असेल. तसेच अचानक धनलाभाची शक्यता आहे. सप्टेंबर/ऑक्टोबर – विवाहाच्या संदर्भात बोलाचाली असतील तर त्या जपून करा. बोलणी कोणतेही कारण नसताना फिसकली जाणार नाही याची दक्षता घ्या. नोव्हेंबर/डिसेंबर-अविवाहितांचे विवाह ठरतील संततीविषयक सर्व समस्या मिटतील. तसेच महत्त्वाचे करार होतील. उपासना-: श्रीगणेशाची उपासना किंवा श्री दत्तात्रयांची करावी

2. वृषभ- भाग्यकारक घटनांचा काळ आपल्याला मागील वर्षात अडथळ्याची शर्यत पार पडावी लागली. कुठल्याही कामात यश नव्हते. त्यातच आपल्याकडे म्हणावा असा ध्येयवाद नाही फक्त आपल्या राशीच्या बोधचिन्हाप्रमाणे आपल्याला काम करायला आवडते. प्रत्येक गोष्टीचा हव्यास आहे. व तो सर्व प्रकारचा हव्यास या वर्षात पूर्ण होईल. अविवाहितांचे विवाह ठरतील. त्यांचे निर्णय अचूक ठरतील. सुशिक्षित बेकारांना योग्य असा मार्ग मिळेल. नोकरी करायची का व्यवसाय या संदर्भात काय निर्णय घ्यावा हे त्यांना समजेल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. थोडक्यात जीवनातील हा योग्य असा अनुकूळ काळ आहे. परदेशगमनासाठी प्रयत्न करीत असाल तर त्यामध्ये यश आहे. आपला पाल्य 10 वी 12 वी ला असेल तर त्यालाही चांगले यश मिळेल. शारीरीक/मानसिक/आर्थिक आरोग्य उत्तम राहील. समाजात आपल्या शब्दला किंमत राहील. थोडक्यात या वर्षातील आपला काळ हा अविस्मरणीय जाणार आहे. कलाकारांना व राजकीय पुढार्‍यांना सुद्धा हा काळ चांगला जाणार आहे. जानेवारी/फ ेब्रुवारी 2021 – नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता व्यवसायात अनपेक्षित वाढ होईल व जनसंपर्क वाढेल. मार्च/एप्रिल – कलाकारांना हा काळ अत्यंत चांगला आहे. नवनवीन कामे मिळतील. तसेच आर्थिक वाढ होईल व चिडचिड होईल. जुलै/ऑगस्ट – स्थावर इस्टेटची कामे मार्गी लागतील. त्यात तुमचे एखादे कायम स्वरूपाचे चांगले काम होईल व त्याचा फायदा पुढील पिढीला होईल. सप्टेंबर/ऑक्टोबर – महत्त्वाच्या कामाची बोलणी फिसकटेल व त्यामध्ये आपले कमीतकमी 1-2 महिने वाया जातील. तरी सुद्धा आपण धीर सोडू नका. या महिन्यात आरोग्याचा समस्या उद्भवू शकतात. नोव्हेंबर/डिसेंबर – अचानक धनलाभाचे योग आहेत. थोड्या फार प्रमाणात शेअरमध्ये फायदा होऊ शकतो. जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात. कोर्टाचा निकाल आपल्या मनाविरुद्ध जाऊ शकतो. उपासना- श्री दुर्गास्तोस्त्र किंवा श्रीहनुमानाची करावी

3. मिथुन-अडथळ्यांची शर्यत आपली रास प्रचंड बुद्धिमान समयसुचकता, हास्यविनोद, वैचारिक, परिवर्तन, पराकोटीची सहनशीलता असे एक ना अनेक चांगले गुण आपल्यामध्ये आहेत. या चांगल्या गुणांच्या आधारे आपल्याला प्रतिकूलतेवर मात करायची आहे. कारण एप्रिल 2021 अखेर आपल्या प्रत्येक कामात अडथळे येतील विवाह ठरविणे, शैक्षणिक, नोकरी, व्यवसाय, नोकरदारांची बदली या सर्वामध्ये अपयश वाटते परंतु आपल्याला ज्ञानाची व वक्तृत्वाची आवड असल्यामुळे आपल्याला सहजासहजी यश मिळेल. मात्र मे 2021 नंतर मात्र आपल्याला यश मिळेल. अविवाहितांचे विवाह ठरतील व स्वतःचे निर्णय अचूक राहतील. आपला पाल्य इ. 12 वी ला असेल तर त्याच्या संदर्भात घेतलेले निर्णय अचूक राहतील. तसेच आपल्याला एखादी मार्गदर्शक व्यक्ती आपल्याला भेटू शकते. त्या व्यक्तीच्या सल्ल्याचा उपयोग आपल्याला चांगला होईल. विशेषतः त्या व्यक्तीचे नावाची सुरुवात स नावापासून होईल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. नोकरदार व्यावसायिकांना आपले प्रगतीचे मार्ग दिसून येतील. 2018-19 कसे काढले ते आपल्याला चांगलेच माहित आहे. जानेवारी/फेब्रुवारी 2021 – अनपेक्षित खर्च वाढतील गुप्त शत्रूचा त्रास होईल गुप्त शत्रू हैराण करू शकतात. मार्च/ एप्रिल-नोकरी/व्यवसायाच्या संदर्भात एखादी छानशी बातमी समजू शकते. या दोन महिन्यात नवीन परिचय खूप होतील व त्याचा फायदा होईल. मे/ जून – बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आपल्याकडून जवळच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच खर्चावरही नियंत्रण ठेवावे. उधारी किंवा जुनी येणी वसुल होण्यासाठी खूप तगादे करावे लागतील. जुलै/ ऑगस्ट – आपल्या पाल्याच्या संदर्भातील शैक्षणिक दृष्टीकोनातून निर्णय अचूक ठरतील. त्याचा फायदा त्यांना भावी काळात होईल. सप्टेंबर/ ऑक्टोबर – महिलांना अनपेक्षितपणे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. वेळप्रसंगी ऑपरेशनचे योग येऊ शकतात. तसेच सर्वसामान्याकडून एखादा महत्त्वाचा निर्णय चुकू शकतो. त्यामुळे त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींशी चर्चा करून निर्णय घ्यावा. नोव्हेंबर/डिसेंबर – आरोग्याच्या समस्या उद्भवतील. उष्णतेचे विकार होतील. तसेच शरीरामध्ये कफ वाढेल. वाहन चालवताना सावकाश चालवावे. उपासना – श्री शिव उपासना किंवा श्री व्यंकटेशाची करावी.

4. कर्क- मनावर अनामिक दडपण राहील आपला स्वभाव अत्यंत संवेदनशील असून कधी आपण हसता तर कधी रडता, नकळत आपल्या भावना दुखावल्या तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय रहात नाही. आपण स्वतः जीवनातील कोमलता, मृदुलता, कठोरपणा, हळुवारपणा अनुभवत असताना उत्तम जनसंपर्क आपल्याकडून साधला जातो. परंतु या वर्षात आपण या गोष्टी करताना मानसिक ताण आपल्यावर येणार आहे व त्यातून मनस्ताप होणार आहे. त्यातून चिडचिड होणार आहे. आणि त्याचा परिणाम आपले आरोग्य बिघडण्यावर होणार आहे. तेव्हा हेही दिवस जातील हे वाक्य सन 2021 मध्ये पूर्ण लक्षात ठेवा. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळणार नाही. आपल्याला जे न्यायाधीश न्याय देण्यासाठी बेंचवर आहेत त्यांची बदली होणार आहे. विवाहाच्या संदर्भात पूर्ण चौकशी करूनच निर्णय घ्यावा. वधू-वर पालकांना विवाह ठरविण्याच्या बाबतीत या वर्षात अडचणी येतील. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य मिळणार नाही. उलट त्यांच्याकडून त्रासच होईल. नवविवाहितांनी एकमेकांबद्दल गैरसमज करून नघेता एकमेकांना सांभाळून घ्यावे. इ. 10 वी/12 वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन एकाग्र करून अभ्यास करावा. नोकरदार/ व्यावसायिक यांना म्हणावे असे या वर्षात आर्थिक लाभ होणार नाहीत. या वर्षात आपण दैनंदिन कामकाज चालू ठेवावेव आरोग्य बिघडणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे. जानेवारी/फेब्रुवारी 2021 – आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची समस्या उद्भवू शकते अनपेक्षित खर्चात वाढ होईल. मार्च/एप्रिल – अनपेक्षितपणे नोकरी/व्यवसायात अनपेक्षित अडचणी येतील. तसेच एखादा महत्त्वाचा निर्णय सुद्धा चुकण्याची शक्यता आहे. मे/जून – या दोन महिन्यामध्ये उत्साह राहील. एकप्रकारचा आपला आत्मविश्वास वाढेल. तसेच नोकरी/व्यवसायातील निर्णय परफेक्ट राहतील. जुलै/ऑगस्ट – अचानक धनलाभाचे योग आहेत. थोडा मागील महिन्यात झालेला खर्च आटोक्यात येईल. खर्चावर नियंत्रण राहील. सप्टेंबर/ऑक्टोबर – लग्नाळू मुला-मुलींचे विवाह ठरतील. त्यांचे निर्णय अचूक ठरतील. नोकरी व्यवसायात चांगल्या घटना घडतील. तसेच एखादे महत्त्वाचे काम होईल. नोव्हेंबर/ डिसेंबर – संततीविषयक समस्या मिटतील विद्यार्थ्यांना या महिन्यात केलेल्या अभ्यासाचा फायदा होईल. उपासना – श्री सद्गुरूंची उपासना किंवा श्री शंकराची करावी.

5. सिंह- यशदायी वर्ष………! मागील वर्षात आपल्या संततीविषयक सर्व समस्या मिटल्या विशेषतः ज्यांची मुले इ. 10वी इ. 12वी ला होते. त्याच्या सर्व समस्या सुटणारे हे वर्ष होते. मुळातच आपला स्वभाव अत्यंत मनमोकळा, उदार, आशावादीपणा हे सर्व ध्येयगुण आहेतच परंतु सार्वजनिक जीवनात मिरावयाची आपल्याला खूप हौस आहे. त्यामुळे आपल्या स्वभावत अहंपणा, दिखाऊपणा, ढोंगीपणा हे सर्व अवगुण आपल्यात आहेत. परंतु आपण सद्गुणाच्या जोरावर आपण पुढे जाणार आहत. आर्थिक दृष्टीकोनातून हे वर्ष चांगले जाईल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून यावर्षात आपल्याला थोडेफार त्रासदायक जाईल. कफ-प्रवृत्तीचे तसेच ज्यांना संधिवात सारखा विकार आहे त्यांना त्रास होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोर्ट-कचेरीचे कामे मार्गी लागतील अविवाहितांचे विवाह ठरतील. त्या संदर्भात सर्वांची महत्त्वाची कामे होतील. नोकरदार व्यावसायिक असतील त्यांना नवीन कल्पना सुचतील त्यांची अंमलबजावणी केल्यास भविष्यात खूप मोठा फायदा होईल. स्थावर इस्टेटीचे कामे मार्गी लागतील. राजकारणी व कलाकारांना या वर्षात मनासारखे कामे मिळतील. नवीन वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. जानेवारी/फेब्रुवारी 2021 – या महिन्यामध्ये आपल्याला एखादी मार्गदर्शक व्यक्ती भेटेल व तिचा सल्ला फायदेशीर ठरेल. स्थावर-इस्टेटीचे कामे मार्गी लागतील. नवीन वर्षाची सुरुवातच तुम्हलाखूप चांगली आहे. मार्च/एप्रिल – नोकरदारांना या महिन्यात कमी फायदा होण्याची शक्यता परंतु महत्वाच्या कामा संदर्भात एखादी बातमी समजेल. मे/जून – या महिन्यात आपल्याला वरिष्ठाकडून कामे करून घ्यायची असतील तर अवश्य करून घ्यावे. नोकरी/व्यवसायच्या निमित्ताने लांबच्या प्रवासाचे योग आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात शब्दला वजन प्राप्त होईल. जुलै/ऑगस्ट – हा महिना आपला उत्साह वाढविणारा आहे. प्रचंड प्रमाणात आपल्यामध्ये उत्साह निर्माण होईल व चांगल्या गोष्टीकडे उर्जा नेली जाईल सप्टेंबर/ऑक्टोबर – अनपेक्षित खर्च होईल. या महिन्यात आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तसेच एखादी महत्त्वाची आनंदायी बातमी समजेल. नोव्हेंबर/ डिसेंबर – संततीच्या बाबतीत एखादा निर्णय धाडसाने घ्यावा लागेल. व नवीन कल्पना सुचतील त्यांची अंमलबजावणी मनापासून करा. उपासना – श्री गणेशाची उपासना किंवा सुर्यस्तुती वाचावी

6. कन्या-राग आवरा अन्यथा निर्णय चुकतील अतिचिकित्सक स्वभावाबरोबरच आपण प्रत्यक गोष्टीत शंका काढणारी उत्तम संभाषणाची, हजरजबाबीपणा, उत्कृष्ट परीक्षण, निरीक्षण, राजकारणी धूर्तपणा, बोलण्यात खूप मोकळेपणा नसणे असे आपल्यात सद्गुण आहेत. या वर्षात आपला चिडचिडा स्वभाव खूप होणार आहे. आपला संतापी स्वभाव होणार आहे. हा स्वभाव सन 2020 मध्ये पूर्ण वाढलेला आहे. अजून एवढा वर्ष तुम्हाला हा स्वभाव सांभाळावा लागणार आहे. संतापी स्वभाव वाढल्यामुळे अचानक शत्रुत्व वाढेल. संतापाच्या भरात निर्णय चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षात पोकळ डामडौल, हौस, मौज व हास्यविनोद या गोष्टीपासून दूर राहा अन्यथा आपल्याला मानसिक त्रास खूप मोठ्या प्रमाणत होईल. विद्यार्थांचे अभ्यासावरील लक्ष कमी होईल आळस वाढेल. ज्यांचे पाल्य इ. 10वी/इ. 12वी ला असेल त्यांनी आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे. तसेच वाईट संगत लागेल. तसेच विवाह-संदर्भात योग्य निर्णय घ्यावेत. कारण नसताना घाई करू नये. नोकरदार/व्यावसयिक यांना आपल्या क्षेत्रामध्ये चांगल्या कल्पना सुचल्या तरी त्याची अंमलबजावणी करणे अवघड जाईल राजकारणी व्यक्तींनी आपला मुळचा पक्ष बदलताना तीनदा विचार करावा. तसेच कलाकारांनी सुद्धा आपले प्रोजेक्ट पूर्ण होणार असतील तरच स्वीकारावेत. जानेवारी/फेब्रुवारी – या दोन्ही महिन्यात वाहन चालविताना अत्यंत सावकाश चालवावे. कामे रखडतील तसेच प्रवासात अडथळे येण्याची शक्यता. मार्च/एप्रिल – नोकरदारांची अपेक्षित त्या ठिकाणी बदली होईल तसेच राहिलेली कामे योग्यप्रकारे मार्गी लागतील. मे/जून – या महिन्यात एखादी मार्गदर्शक व्यक्ती भेटेल व तिचा सल्ला अचूकपणे आपल्याला उपयोगी पडेल. आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन ओळखी होतील त्याचा उपयोग प्रदीर्घ काळासाठी होईल जुलै/ऑगस्ट – हितशत्रूंचा त्रास जाणवेल. तसेच डोळ्याचे ऑपरेशन होण्याचे योग आहेत. परदेशात जाण्याचा प्रयत्न करीत असाल तर त्यात यश नक्की सप्टेंबर/ऑक्टोबर – अचानक धनलाभाचे योग आहेत. जुनी येणी वसूल होतील. खूप दिवसांनी हातात चलन प्राप्त होईल. नोव्हेंबर/डिसेंबर – पोटाच्या आरोग्याचा तक्रारी जाणवतील. अनपेक्षित प्रवास होईल. प्रवासाची दगदग वाढेल. उपासना- श्री दुर्गादेवीची उपासना किंवा श्री विष्णूसहस्त्रनाम वाचावे.

7. तूळ- स्थावर इस्टेटीचे योग या वर्षात आपले स्थावर इस्टेट तसेच वाहन सौख्याचा दृष्टीकोनातून भरपून अनुकूळ ग्रहमान आहे. आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरतील मुळातच आपल्या राशीचे बोधचिन्ह तराजू आहे. त्यामुळे आपण कुठेच कमी जास्त पण करीत नाही. अगदी प्रेमात सुद्धा…..! पण आपण स्वभावतला थोडासा गंभीरपण कमी केला तर आपल्याला या वर्षात खूप आनंद मिळेल. उत्कृष्ट कौटुंबिक प्रेम, जीवनावर श्रद्धा, सत्याची चाड, कर्तव्य, प्रेम, न्याय, तत्त्व या सर्वच बाबतीत आपला समतोलपणा आहे. या वर्षात स्थावर इस्टेटीची कामे मार्गी लागतील. संततीच्या सर्व समस्या मिटतील. विशेषतः ज्यांचे पाल्य इ. 10वी/इ. 12वीत आहेत त्यांच्या बाबतीत घेतलेलं निर्यय अचूक राहतील. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल अविवाहितांचे लग्न ठरतील. जोडीदार मनासारखा मिळेल. तसेच सुशिक्षित बेकारांना सुद्धा नोकरी लागेल. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. नोकरदारांची बदली खूप लांब होणार नाही. घराशेजारी होईल त्यांना याबाबतीत प्रवास कमीत कमी करावा लागेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात प्रगती राहील. शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असेल तर अवश्य जा कारण त्यातून खूप फायदा होईल. जानेवारी/ फेब्रुवारी 2021 – या महिन्यात आपल्या लिखाणाला खूप प्रसिद्धी मिळेल तसेच कवी लेखकांना हे दोन महिने अत्यंत चांगले आहेत. मार्च/ एप्रिल – वाहन चालविण्यासाठी सावध व्हावे. सावकाश चालवावे. जवळच्या नातेवाईकांपासून आपल्याला फायदा होईल त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. मे/ जून – नोकरदारांची बदली होण्याची शक्यता आहे. त्यांची बदली योग्य ठिकाणी होईल. नोकरी/व्यवसायात प्रगतीच्या संधी आहेत. जुलै/ऑगस्ट – मित्र वर्गापासून फायदा होईल अचानक धनलाभाचे योग आहेत. आपल्या जोडीदाराचा सल्ला मानल्यास आर्थिक फायदा होईल. सप्टेंबर/ऑक्टोंबर – हितशत्रूपासून त्रास. अचानक खर्चाचे योग आहेत शारीरिक व्याधी जुनी असल्यास ऑपरेशन होऊ शकते. नोव्हेंबर/ डिसेंबर – बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास वाद होणार नाहीत. अन्यथा खूप मोठ्या प्रमाणावर भांडणे होण्याची शक्यता तसेच धनहानी होईल. उपासना- श्री व्यंकटेश स्त्रोत्र किंवा श्री दुर्गादेवीची करावी.

8. वृश्चिक- आर्थिक प्रगती होईल आपला स्वभाव विचारी, मनाचा समतोलपणा राखणारा, कोणत्याही परिस्थितीत बदल झाल्यास शांतपणे सामोरे जाणारा व अत्यंत निश्चयी असा स्वभाव आहे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला कि त्या गोष्टीसाठी शेवटपर्यंत करणे असा आपला स्वभाव आहे. आपल्याकडून इतरांच्या अगदी नकळत भावना दुखावल्या जातात व आपल्याला अनेक शत्रू निर्माण होतात. परंतु आपला मूलतः स्वभाव असा असतो कि, आपण जसे इतरांशी सरळ वागतो. तसेच इतरांनी सुद्धा आपल्याशी सरळ वागावे. सन 2016 व 2017 च्या तुलनेत सन 2019-20 आपल्याला बरे गेले. सन 2020 मध्ये आर्थिक प्रगती झाली नाही तरी सन 2021 हे आपल्याला आर्थिक प्रगतीपथावर नेणारे वर्ष राहील आपल्याला मागे वळून पाहावे लागणार नाही. अविवाहितांचे विवाह ठरतील. परदेशी जाण्याचे मनसुबे प्रत्यक्षात येतील विद्यार्थ्यांना तर फारच अभ्यासासाठी अनुकूळ काळ आहे. ज्यांचे पाल्य इ. 10वी व 12वी ला आहेत त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. नोकरदार/ व्यावसायिक यांना या वर्षात नवीन कल्पना सुचतील. नवविवाहितांना आनंदाची बातमी समजेल. राजकारणी व चित्रपट सृष्टीतील कलाकारांना हे वर्ष स्मरणीय जाईल नोकरदारांची बदली अपेक्षित त्या ठिकाणी होईल. स्थावर इस्टेटीची कामे मार्गी लागतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. जानेवारी/फेब्रुवारी 2021- उष्णतेचे विकार बळावतील हितशत्रूंचे त्रास जाणवेल. जोडीदाराबरोबर मतभेद संभवतात. परंतु शांत राहा. मार्ग निघेल. मार्च/एप्रिल – मध्यम वयातील पती/ पत्नीचे ऑपरेशनचे योग आहेत. किरकोळ स्वरूपाची शस्त्रक्रिया होऊ शकते. मध्यमवयातील व्यक्तीला फक्त हा नियम लागू राहील. इतरांना आजारपणावर खर्च करावा लागेल. मे/जून – जोडीदाराच्या सल्यानुसार वागल्यास दोन महिने खूप आनंदात जातील. वरिष्ठ आपल्यावर खुश राहतील. त्यांच्या गुडबुकमध्ये आपण राहाल. तसेच व्यापारी वर्गाची महत्त्वाची कामे होतील. जुलै/ऑगस्ट – अचानक धनलाभाचे योग आहेत. वरिष्ठांकडून एखादे महत्त्वाचे काम होतील. एखादी महत्त्वाचा सल्ला देणारी व्यक्ती भेटेल. सप्टेंबर/ऑक्टेबर – एखादी मार्गदर्शक व्यक्ती भेटेल. नवीन मित्रपरिवार भेटेल. आर्थिक प्रगती होईल. शेअर्समध्ये लाभ होऊ शकतो. नोव्हेंबर/डिसेंबर- उत्साहाच्या भरात जपून बोलावे. जवळच्या नातेवाईकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्या. उपासना – श्री गणेशाची उपासना किंवा श्री भगवान शिवाची करावी.

9. धनु- बेसावध राहू नका सन-2020 पासून आपली परिस्थिती व मानसिक स्थिती बदलली तरी पण आपल्याला अजून साडेसाती असल्यामुळे बेसावध राहू नका. एकतर आपल्या चेहर्‍यावर विद्वत्तेचे तेज, निर्णय घेण्यास स्वतःला उशिरा होत असाल तरी इतरांना मात्र आपण उत्कृष्ट मार्गदर्शन करता. तसेच सन्मार्गाने पुढे जाण्याची आपली प्रवृत्ती असा आपला स्वभाव आणि या स्वभावाला अनुसरूनच आपली भावी वाटचाल होणार आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. मनासारखे जोडीदार मिळेल. तसेच सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळेल. कर्जप्रकरणे मंजूर होतील. व्यावसायिकांची प्रगती होईल. कोर्ट-कचेरीमध्ये यश मिळेल. तसेच यामध्ये फार व्यत्यय येणार नाही. इ. 10वी व इ. 12वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. योग्य साईड घेतली जाईल. स्थावर इस्टेटीचे कामे मार्गी लागतील. हितशत्रूंचा त्रास कमी होईल. शारीरिक/मानसिक/आर्थिक या तीनही प्रकारचे आरोग्य उत्तम राहील. राजकारणी व कलाकार यांना हे वर्ष अविस्मरणीय जाईल. उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करीत असाल तर निश्चित यश मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याचे हे वर्ष आहे. काळजी करू नका. नवीन वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. जानेवारी/फेब्रुवारी 2021 – लेखक-कवींना या महिन्यात प्रतीस्पर्धी मिळेल. लिखाणाच्या संदर्भात चांगल्या कल्पना सुचतील. मार्च/एप्रिल – परदेशी जाण्याचा प्रयत्न करीत असल्यास यश मिळेल. या दोन महिन्यात केलेला प्रवास विनाकारण प्रवास होणार नाही. मे/ जून – जोडीदाराबरोबर वाद होऊ शकतात. परंतु हे तेवढ्यापुरतेच आहे हे लक्षात ठेवा. कोर्ट-कचेरी कामात अडथळे येतील. जुलै/ऑगस्ट – एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनपेक्षितपणे एखादी मार्गदर्शक व्यक्ती भेटेल. व तिचा सल्ला आपल्याला उपयोग पडेल सप्टेंबर/ ऑक्टोबर – नोकरी व्यवसायात कटकटी येऊ शकतात. तेव्हा विचार करून बोला म्हणजे नंतर पश्चातापाची वेळ येणार नाही. नोव्हेंबर/ डिसेंबर – नवनवीन ओळखी होतील. अवतीभोवतीचे वातावरण चांगले राहील. नवनवीन कल्पना सुचतील पण हितशत्रूपासून सावधान उपासना- श्री सूर्यस्तोत्र किंवा श्री दत्तस्तोत्र वाचावे.

10. मकर- भ्रमात राहू नका, खडतर प्रवास आपल्याला या वर्षात साडेसातीचा तीव्र मुकाबला करावा लागेल. आपल्या राशीचा स्वामी शनी आहे. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होणार नाही या भ्रमात राहू नका. साडेसाती नसताना सुद्धा आपल्याला साडेसाती जाणवते त्यामुळे आपल्याबद्दल समाजात जास्तच गैरसमज आहेत. आणि या गैर-समजाला तर सीमाच नाही. कोणी शिस्त मोडली तर वाईटपणा घेण्यास आपण कचरत नाही. एकच थोडा स्वभावदोष आपल्यात आहे. तो म्हणजे मार्मिक व कुत्सित बोलणे. हे आपण टाळल्यास समाज आपल्याला डोक्यावर घेऊन नाचेल. विद्यार्थी वर्गाला कष्टाच्या मानाने यश कमी आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तसेच अविवाहितांनी सुद्धा स्थळांची नीटपूर्ण माहिती घेऊन होकार द्यावेत. तसेच नोकरी/व्यावसायिकदार यांना सुद्धा या वर्षात खडतर प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे श्रद्धा और सबुरी हा मंत्र पूर्ण-2021 या वर्षामध्ये लक्षात ठेवा. अन्यथा भरून निघणारे नुकसान होईल. स्थावर इस्टेट खरेदी विक्री करताना मध्यस्थावर अवलंबून राहू नका. स्वतःच कायदेशीर बाबी तपासून पहा. नोकरदारांनी बदलीसाठी वरिष्ठांकडे आग्रह धरू नये. असा आग्रह धरल्यास याही पेक्षा त्रासदायक ठिकाणी बदली होईल. कोर्ट-कचेरी कामे लांबणीवर पडतील. जानेवारी/फेब्रुवारी 2021 – या महिन्यात आपले स्थावर इस्टेटीचे कामे मार्गी लागतील. अपेक्षेपेक्षा जास्त अर्थार्जन होईल. जुनी येणी वसूल होतील. मार्च/एप्रिल – महत्त्वाच्या बाबतीत फसवणूक होऊ शकते. तेव्हा सर्व सांभाळूनच व्यवहार करा. विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा. मे/जून – या दोन महिन्यात आपल्याला एखादे वरिष्ठांकडून काम करून घ्यायचे असेल तर करून घ्यावे. अडलेली कामे मार्गी लागण्याचा काळ आहे. जुलै/ऑगस्ट – विवाहसंदर्भात काही बोलाचाली होऊ शकतात. लग्नाळू मुला-मुलींसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. वाहन चालविताना सावकाश चालवा. सप्टेंबर/ ऑक्टोबर – नवीन ओळखी होतील. त्यामधून नवीन कल्पना सुचतील या कल्पनांना भावी काळात तुम्हाला चांगला उपयोग होईल. नोव्हेंबर/ डिसेंबर – नोकरदारांचे बदली होण्याचे योग आहेत. नोकरी व्यवसायात जरा सांभाळून राहा मतभेदाची शक्यता आर्थिक नुकसान संभवते. उपासना- श्री विष्णूसस्त्रनाम किंवा श्री हनुमान चालीसा वाचावी

11. कुंभ- साडेसाती, तरीसुद्धा प्रगतीपथावर आपल्याला साडेसाती असली तरी अजिबात काळजी करू नका कारण आपल्या राशीत शनिमहाराज यायला अजून एक वर्ष बाकी आहे. फक्त स्वतःच्या तंद्रीत राहू नका. स्वतःच्या तंद्रीत राहणे हा आपला दुर्गुण आहे. त्याचा फटका आपल्याला बसू शकतो. बाकी आपल्याकडे इतर चांगल्या गुणांची भरपूर खाण आहे. प्रचंड बौद्धिक पातळी, स्वतंत्रप्रियता, उकृष्टतेचे ध्यास थोडे व मोजके बोलणे पण त्यात मुद्देसूदपणा, स्वयंशिस्त या सर्व गोष्टी तुमच्यात आहेत. या वर्षात आपली सर्व कामे मार्गी लागतील या वर्षात आपल्याला नवीन नोकरी व्यवसायात कल्पना सुचतील तसेच अंमलबजावणी होईल. नोकरदारांना प्रोमोशन मिळेल. आर्थिक दृष्टीकोन हे वर्ष अतिशय चांगले जाईल. अविवाहित असल्यास विवाह ठरण्याचे योग आहेत. इ. 10वी इ. 12वी च्या विद्यार्थ्यांना हे नवीन वर्ष यशाकडे नेणारे ठरेल. तसेच, निर्णय बिनचूक राहतील. कोर्टकचेरीच्या कामामध्ये यश मिळेल. एकदंरीत शारीरिक/आर्थिक/मानसिक या तीनही पातळीवर आपण यशस्वी राहाल. स्थावर-इस्टेटीच्या कामामध्ये यश मिळेल. नवीन वाहन घेण्याचा विचार आपल्या मनामध्ये येतील. परदेशगमनासाठी प्रयत्न करीत असाल तर त्यामध्ये यश निश्चित आहे. नवविवाहितांसाठी हे नवीन वर्ष खूप आनंदायी व आशादायी जाणार आहे. जानेवारी/फेब्रुवारी 2021 – आरोग्याच्या बाबतीत प्रश्न सतावतील. तसेच हितशत्रूंपासून त्रास होईल परंतु त्यांच्यामुळे आपले नुकसान होणार नाही मार्च/एप्रिल – मातृसौख्य मिळेल. प्रॉपट्री किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. वृद्धांना कौटुंबिक सौख्य मिळेल. मे/जून – जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात. थोडा हा काळ कटकटीचा असेल. तसेच या महिन्यात आपल्या आईच्या नातेवाईकांशी संपर्क येईल. जुलै/ऑगस्ट – वाहन चालविताना सावधपणे चालवा. थोडासा बंधन योग आहे. तसेच प्रवासासाठी अडचणी येऊ शकतात. सप्टेंबर/ऑक्टोबर – या दोन महिन्यामध्ये नवीन ओळखी होतील. त्याचा फायदा नोकरी व्यवसायात होईल. नवीन कल्पना सुचतील. नोव्हेंबर/डिसेंबर – नोकरीत अधिकार प्राप्ती होईल. परंतु थोड्या कटकटी होतील. तसेच वडिलांच्या वर उपचार म्हणून एखादी शस्त्रक्रिया होऊशकते. उपासना – श्री दुर्गादेवी किंवा हनुमान चालीसा वाचावी.

12. मीन- मनोकामना पूर्ण होतील या पूर्ण वर्षात आपल्याला पूर्ण अनुकूल वातावरण असल्यामुळे निश्चितच फायदा होईल. आपली सात्विक वृत्ती असल्यामुळे आपण कुणाकडूनच अतिरेक होईल असा त्रास देत नाहीत. त्यामुळे आपल्या नोकरी/व्यवसायात या वर्षी प्रगती होईल. तसेच संततीविषयक पूर्ण प्रश्न मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील. त्याचा फायदा नोकरी व्यवसायात होईल. अविवाहित असाल तर विवाह ठरतील. नवविवाहितांना आनंदाची बातमी समजेल. नोकरदारांना प्रमोशन मिळेल. कोर्ट-कचेरीच्या कामात विलंबाने यश मिळेल. स्थावरइस्टेट नवीन गाडी खरेदीचे योग आहेत. व त्यापासून लाभ होतील. राजकारणी व कलाकारांना हा काळ चांगला आहे. महिला वर्गाला हे वर्ष शारीरिक/आर्थिक/मानसिकदृष्ट्या चांगले जाईल. मागील जुने काही वाद असतील तर मिटतील. तसेच आपण लेखक/प्रकाशन/कवी यामधील असल्यास त्याला प्रसिद्धी मिळेल. तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार असाल, तर किंवा प्रयत्न करीत असल्यास त्यामध्ये निश्चितच यश मिळेल. अध्यात्मिक मार्गातील एखादी व्यक्ती भेटेल. त्या व्यक्तीने केलेले मार्गदर्शन आपल्याला निश्चितच उपयोगी पडेल. तसेच आरोग्याचा बाबतीत काही प्रश्न उद्भवणार नाही. पत्रव्यवहारामध्ये काही अडचण येणार नाही. नोव्हेंबर/डिसेंबर 2020 – अनपेक्षित खर्च होईल. शिल्लक पैशाला हात लावावा लागेल. तेव्हा थोडे काळजीपूर्वक या महिन्यात वागा. तसेच डोळ्यांना इजा होऊ शकते तेव्हा सांभाळून राहा. जानेवारी/फेब्रुवारी 2021 – स्थावर इस्टेटीचे महत्त्वाचे काम होईल तसेच त्या संबंध व्यवहाराचा निर्णय अचूक राहील. नोकरी/ व्यवसायात प्रगती होईल. मार्च/एप्रिल – प्रवासाचे योग आहेत. नोकरी/ व्यवसायाच्या निमित्ताने आपला प्रवास होईल. तो प्रवास निरर्थक असणार नाही. मे/जून-प्रवास तसेच लेखक/कवींना या वर्षात खूप प्रसिद्धी मिळेल परदेशगमनासाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात यश आहे. जुलै/ऑगस्ट – आरोग्याचे प्रश्न सतावतील. उष्णतेचे विकार होण्याची शक्यता. नोकरी/व्यवसायात हितशत्रू वर डोके काढण्याची शक्यता. सप्टेंबर/ऑक्टोबर – नोकरीमध्ये आपल्या वरिष्ठांची बदली होईल. त्यामुळे आपल्याकडे ऑफिसची जबाबदारी येईल. तसेच थोड्या कटकटी वाढतील. नोव्हेंबर/डिसेंबर – या महिन्यापासून आपला ओढा अध्यात्माकडे राहील तसेच शिक्षणासाठी परदेशी जाणार असाल तर त्यात यश मिळेल. उपासना- श्री गणेश किंवा श्री दत्तात्रयांची उपासना करावी.

– संजय कुलकर्णी संपर्क : 7588021666

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा