१८९ लिटर रक्तदानाचा विक्रम

एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी काही योगदान देण्यासारखी माणुसकी दाखवणे हे खरोखरच महत्त्वाचे आहे. आता याबाबत चांगली जनजागृतीही झाली आहे. नेत्रदान, अवयवदान करणारे अनेक आहेत. अनेकांनी मृत्यूनंतर देहदान केलेले आहे. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश आपल्याला जागोजागी पाहायला मिळतो. मात्र, हा संदेश वाचून केवळ गप्प न बसता एका 92 वर्षीय आजोबांनी चक्क 189 लिटर रक्तदान करण्याचा विक्रम केला आहे. अमेरिकेतील कोलोराडोमधील लव्हलँड भागात राहणा-या या आजोबांचे नाव रॉन रिडी असे आहे. या आजोबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आजवर 400 वेळा रक्तदान केले आहे. या रक्तदानातून त्यांनी तब्बल 189 लिटर रक्त रक्तपेढ्यांमध्ये जमा करण्याचा विक्रम केला आहे. या रक्तदानामुळे त्यांनी आजवर किमान 1200 जणांचा जीव वाचवला आहे.

त्यांनी सर्वप्रथम 60च्या दशकात आपल्या एका अपघातग्रस्त मित्राला रक्तदान केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आणखी एका अपघातग्रस्त महिलेला रक्त दिले. आणि पुढे हळूहळू त्यांना रक्तदान करण्याची सवयच लागली. ते महिन्यातून दोनदा रक्तदान करतात. या अभूतपूर्व कामगिरीसाठी अमेरिकेतील ब्लड डोनेशन सेंटरने रॉन आजोबांचा सन्मान केला आहे. या आजोबांचे वय 92 असले तरी त्यांना अद्याप थांबण्याची इच्छा नाही. त्यांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रक्तदान करायचे आहे. त्यांच्या मते, त्यांना रक्तदान करण्याचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करायचे आहेत. कारण त्यामुळे तरुण पिढीला रक्तदानासाठी प्रेरणा मिळेल असे त्यांना वाटते. ते म्हणतात लोकांना जीवनदान देण्यात जो आनंद आहे तो वर्णन करता येणार नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा