आयुर्वेदिक गर्भसंस्कार

सुतिकेचा आहार-विहार तसेच शारीरिक व मानसिक स्थिती यावर स्तन्यउत्पत्ता असते; म्हणून सूतिकेचे मन प्रसन्न, आनंदी राहील याची काळजी घ्यावी. क्रोध, शोक, प्रवास, शारीरिक कष्ट, दिवास्वाप (दिवसा झोपणे), वार्‍यामध्ये जाणे, प्रकाश, वारा यांचे अंगावर घेणे, चुकीचा आहार घेणे या गोष्टी टाळाव्यात. या सर्व गोष्टींमुळे वात प्रकोप असतो व त्यामुळे सूतिकेची त्वचा रुक्ष होऊन ताप येणे, सांधे जखडणे, केस गळणे, वजन वाढून बांधा बिघडणे, संधीवात, आमवात, कंबर, पाठदुखी विकार जडतात. ते बाळ अंगावर पीत असताना सूतिकेचे मन आनंदी व प्रसन्न ठेवावे.

बाळंतपणानंतर शरीराची झीज झालेली असते. तसेच प्रसूतीनंतर योनीभाग नाजूक झालेला असतो; म्हणून किमान दीड महिना शारीरिक संबंध येऊ न देणेच हितावह असते. पंख्याची हवा घेणे, अथवा कुलरमध्ये बसणे, थंड पाण्याने आंघोळ करणे, भांडी धुणे, कपडे धुणे, फरशी पुसणे व अति काळजी करणे; यामुळे प्रकुपित झालेला वातदोष अधिकच प्रकुपित होतो व त्यामुळे वात व्याधी उद्भवतात. बाळंतपणानंतर 3 ते 4 महिने सूतिका परिचर्या पाळणे जरुरीचे असते. सव्वा ते दीड महिना डोक्याला स्कार्फ बांधणे, कानात कापसाचे बोळे ठेवणे जरुरीचे असते. तीन महिन्यानंतर सूतिकेने शरीराचा बांधा सुस्थितीत येण्यासाठी तसेच कंबर, पाठदुखी टाळण्यासाठी योगासने करणे जरुरीचे असते. योगासनांमुळे शरीरातील अतिरिक्त वाढलेला मेद कमी होऊन शरीराचे बल वाढविण्यास मदत होते. तसेच स्त्रीचे शारीरिक व मानसिक आरोग्य व्यवस्थित राहून हॉर्मोन्सचे प्रमाण प्राकृत राहण्यास मदत होते. संपूर्ण गर्भावस्थेत स्त्रीचे वजन 12 ते 14 किलोने वाढलेले असते. प्रसूती झाल्यानंतर 5 ते 6 किलोने वजन लगेच कमी होते. जास्तीचे वजन कमी होण्यासाठी 8 ते 9 महिने लागतात. बाळंतपणानंतर अंदाजे 3 ते 4 महिन्यांनी हलकासा चालण्याचा व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार करावेत. पूर्वी वर्णन केलेल्या सूक्ष्मक्रिया, योगासने, प्राणायाम करावा. त्याच प्रमाणे योगासनांमध्ये पर्वतासन, शलभासन, भुजंगासन, धनुरासन, नौकासन, पवनमुक्तासन, गोमुखासन, उत्तानपादासन, सुलभ अनंतासन, सूर्यनमस्कार ही योगासने करावीत; यामुळे पोट, मांड्या, नितंब, कंबर येथील चरबी झडून तेथील स्नायू मजबूत व लवचीक होतात.

तसेच गर्भाशयाचे आकुंचन होण्यासाठी, योनीमुख, मूत्रद्वार, गुदद्वार येथील स्नायू पूर्वावस्थेत येण्यासाठी सहजोली मुद्रा करावी. हे कसे करायचे याचा उल्लेख आपण मागील प्रकरणातील व्यायामाचे प्रकारात पाहिलेले आहे. आजच्या काळातील स्त्रिया बांधा बिघडू नये तसेच वाढलेले वजन कमी करण्यासाठी क्रश डाएट व भरपूर व्यायाम करतात; यामुळे शरीराची आणखीनच हानी होऊन वातप्रकोप होतो; त्यामुळे असे न करता आहार योग्य ठेऊन सोपी योगासने करावीत. या सर्व व्यायाम प्रकारांमुळे वर्षभरात 8 ते 10 किलो वजन कमी होऊन गर्भावस्थेच्या पूर्वी जसे शरीर असते तसेच शरीर पुन्हा प्राप्त होऊ शकते. (क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा