महान साधूसाध्वीजींची सेवा करण्याचा बहुमान मिळणे हे परमभाग्य – हस्तीमल मुनोत

आचार्य सम्राट श्री शिवमुनीजी महाराज यांचे आनंदधाम येथून प्रस्थान

अहमदनगर – समस्त प्राणीमात्रांची सेवा हिच ईश्वरसेवा असा महान संदेश देणार्‍या आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या स्मृतीस्थळी युगप्रधान युगप्रधान आचार्य सम्राट श्री शिवमुनीजी महाराज साहब यांच्या सान्निध्यात आत्मध्यान शिबिरात सहभागी होण्याची संधी नगरसह राज्यातील तसेच देशभरातील साधकांना मिळाली.

तब्बल 20 वर्षानंतर नगरच्या भूमीत येवून येथील चराचरात चैतन्य फुलविणारे आचार्य सम्राट श्री शिवमुनीजी महाराज, युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज, शिरीषमुनीजी महाराज, शुभममुनीजी महाराज, अक्षयऋषीजी महाराज यांच्यासह उपस्थित साधूसाध्वीजींनी नगरकरांना सकारात्मक उर्जेचा मोठा स्त्रोत दिला. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीची प्रचिती या महान साधूसाध्वीजींच्या सान्निध्याचा लाभ मिळाल्याने सर्वांना आली. जीवनाला दिशा देणार्‍या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांना मिळाला. या महान तपस्वी, साधूसाध्वीजींची सेवा करण्याचा बहुमान मिळणे हे परमभाग्य ठरले, अशी प्रतिक्रिया जैन श्रावक संघाचे अध्यक्ष समाजभूषण हस्तीमल मुनोत यांनी दिली आहे.

आचार्यसम्राट श्री शिवमुनीजी महाराज यांनी नुकतेच नगरमध्ये विहार करून आनंदधामच्या प्रांगणात पाच दिवस आत्मध्यान शिबिराद्वारे साधकांना जीवनात आमूलाग्र बदल घडविणारे सोनेरी मार्गदर्शन केले. सोमवारी सकाळी या शिबिराच्या समारोपानंतर श्री शिवमुनीजी महाराज यांनी आनंदधाम येथून रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चरकडे प्रस्थान ठेवले.

तत्पूर्वी आनंदधामच्या पवित्र प्रांगणात पाच दिवसीय आत्मध्यान शिबिरातून व दररोजच्या प्रवचनातून श्री शिवमुनीजी महाराज यांनी उपस्थितांना आदर्श जीवनपध्दतीचे अनमोल मार्गदर्शन केले. यात दररोज सकाळी 9 ते 10 प्रवचन व सायंकाळी 5 वाजता मंगलपाठ कार्यक्रमासही भाविक उपस्थित होते.

या मंतरलेल्या पाच दिवसांच्या कार्यक्रमांबाबत प्रतिक्रिया देताना हस्तीमल मुनोत पुढे म्हणाले की, तब्बल दोन दशकानंतर पूज्य श्री शिवमुनीजी महाराज नगरमध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी समस्त सकल जैन समाज उत्सुक होता. आदर्श विचार व विशेषत: ध्यानधारणेतून मन शुध्दीकरण व मन परिवर्तन घडविण्याचे कार्य पूज्य श्री शिवमुनीजी महाराज करीत असतात. त्यांच्या सान्निध्याचा प्रत्यक्ष लाभ या कालावधीत सर्वांना मिळाला. सर्व नित्यकर्म, व्यवहार, जीवनातील ताणतणाव बाजूला ठेवून आबालवृध्द साधक आत्मध्यान शिबिरात सहभागी झाले होते. जगातील कोणत्याही मोठ्या विद्यापीठात कितीही पैसा खर्च करून न मिळणारे ज्ञान व मार्गदर्शन या शिबिरात सहभागी झालेल्यांना मिळाले.

शिबीर कालावधीत सर्व साधकांची निवासापासून गौतमप्रसादीपर्यंतची सर्व व्यवस्था आनंदधाम परिसरातच करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येकाला शिबिराचा विनाव्यत्यय पुरेपुर लाभ घेता आला. साधूसाध्वीजींची शिकवण हे प्रत्येकाचा जीवनाचा खरा मूलाधार आहेत. त्याची प्रचितीच याकाळात सर्वांना आली.

या आत्मध्यान शिबिरासाठी श्री आनंद विहार ग्रुप, धार्मिक परिक्षा बोर्ड, बडीसाजन मंगल कार्यालय, बडी साजन युवक संघ, जैन ओसवाल युवक संघ, आगरकर मळा आनंद महिला मंडळ, छायाताई फिरोदिया परिवार, युवाचार्य भक्त मंडळ, जय आनंद महावीर युवक मंडळ, जैन सोशल फेडरेशन उपनगर श्रीसंघ, सर्व जैन आनंद पाठशाला, आनंदऋषीजी हॉस्पीटल, जय आनंद महिला ग्रुप, व्यापारी मित्र मंडळ, माईक लाईट सहकार्य शिंगी इलेक्ट्रिकल, चंदकात मुथा डेकोरेटर, अन्नपूर्णा केटरिंग संतोष गुगळे आदींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आठ दिवस गौतम प्रसादीची व्यवस्था सौ.सविता रमेश फिरोदिया यांच्यावतीने करण्यात आली होती.

या सर्व कार्यक्रमांसाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, सेक्रेटरी संतोष बोथरा, उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, सतीश लोढा, संतोष गांधी, अभय लुणिया, आनंद चोपडा, नितीन कटारिया, रोशन चोरडिया, मनिषा मुनोत, सरोज कटारिया, नवरतन डागा, रुपेश पारख, मनिषा मुनोत, ज्योती पितळे, प्रितम गांधी, नितीन शिंगवी, अनिल दुगड, दीपा कोठारी, नेहा लुणावत, नवनीत गांधी, नकुल फिरोदिया आदींनी परिश्रम घेतले. शेवटी सेक्रेटरी संतोष बोथरा यांनी आभार मानले. श्री शिवमुनीजी महाराज यांचा आगामी चातुर्मास पुणे येथे होणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा