नगरच्या उद्योजकामुळे देशात लवकरच होणार मायक्रोलाईट एअरक्राफ्ट उत्पादनाचा श्रीगणेशा

सैन्यदले, नैसर्गिक आपत्तीत मदतकार्यासाठी उपयुक्त ; विजय सेठी यांची ‘मॅक्सलिंक’ व द. आफ्रिकेच्या ‘मायक्रो एव्हिएशन’मध्ये करार

मुंबई- सैन्य व निमलष्करी दले, नैसर्गिक आपत्तीत मदतकार्य, शेती यासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या मायक्रोलाईट एअरक्राफ्टच्या उत्पादनाचा भारतात लवकरच श्रीगणेशा होणार आहे. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पाऊल उचलले आहे एका नगरकराने! ‘बॅट हॉक’ मायक्रोलाईट एअरक्राफ्टच्या उत्पादनासाठी मूळचे राहुरीचे उद्योजक विजय सेठी यांच्या कंपनीने दक्षिण आफ्रिकेतील ‘मायक्रो एव्हिएशन कंपनी’ शी करार केला. त्यावर आज मुंबईत सह्या झाल्या.

‘मेक इन इंडिया’ मोहिमेत या विमानांचे उत्पादन संबंधित सरकारी खात्यांची परवानगी मिळताच महाराष्ट्रात तातडीने सुरू होईल. त्यामुळे 125 ते 150 व्यक्तींना रोजगार उपलब्ध होईल. मुंबईत आज झालेल्या करारावर ‘मायक्रो एव्हिएशन’ चे कार्यकारी संचालक टेरी पापस व ‘मॅक्स लिंक अॅडव्हेंचर स्पोर्ट्स प्रा. लि.’’ चे अध्यक्ष विजय सेठी यांनी सह्या केल्या. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या व्यापार व उद्योग विभागाच्या आशिया विभागाचे संचालक तुलानी एम्पेटसेनी, ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’ च्या महाराष्ट्र परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती कश्मिरा मेवावाला, इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेसचे अध्यक्ष मनप्रीत सिंग, दक्षिण आफ्रिकेच्या ‘सामडेक’चे (एक्सपोर्ट काउन्सिल) कार्यकारी संचालक सँडायल एन्डीलोवू उपस्थित होते. या सर्वांनी दोन्ही कंपन्यांना शुभेच्छा दिल्या. हा करार दोन्ही देशांमधील औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने पोषक व महत्त्वाचा असल्याचे मत या त्यांनी व्यक्त केले.

श्री. सेठी म्हणाले की, छंदाचे रूपांतर उद्योगामध्ये करण्याची कल्पना सुचली. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या लक्षणीय मोहिमेतून हे साध्य करता येईल, हे लक्षात घेऊन आमच्या मॅक्सलिंक कंपनीने मायक्रो एव्हिएशन कंपनीशी बोलणी केली. मायक्रोलाईट एअरक्राफ्टच्या निर्मितीत या कंपनीचा मोठा अनुभव असून, त्यांनी आतापर्यंत सुमारे 500 विमाने उत्पादित करून चीन, ऑस्ट्रिया आदी देशांमध्ये विकली आहेत. याच कंपनीचे तंत्रज्ञान वापरून या विमानांची पूर्णपणे भारतात जुळणी केली जाणार आहे. त्यासाठी लागणारे अन्य भाग प्राधान्याने स्वदेशी निर्मितीचे असतील. महाराष्ट्रात, शक्यतो पुणे परिसरात हा उद्योग उभा राहील. त्यातून लक्षणीय रोजगार निर्मिती होईल.

मुंबईत झालेल्या करारानुसार ‘मॅक्सलिंक’ येत्या तीन वर्षांमध्ये 200 विमानांची जुळणी करून विक्री करील. या उद्योगामुळे भारतात मायक्रोलाईट एअरक्राफ्ट उत्पादनाचा श्रीगणेशा होत असल्याचे सांगून विजय सेठी म्हणाले की, दोन व्यक्ती बसण्याची क्षमता असलेल्या या विमानाची किंमत साधारणपणे 45 लाख रुपये म्हणजे अत्याधुनिक शानदार मोटारीएवढी असेल. इंधन व देखभालीचा खर्च अतिशय कमी असून, नेहमीच्या पेट्रोलवर ते उडते. पेट्रोलचा वापर तासाला 16 लिटर असा वाजवी आहे. जगप्रसिद्ध रोटॅक्स इंजिनाचा त्यात वापर केला असून, अन्य सुटे भाग सहज उपलब्ध होतात. ही लाईट एअरक्राफ्ट भारतात सर्व दृष्टीने उपयोगी पडतील. संरक्षण दले, सीमा सुरक्षा दले, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य, पाहणी, पिकांवर मोठ्या प्रमाणात फवारणी यासाठी त्याचा सहज उपयोग करता येतो. हेलीकॉप्टरसाठी हा अतिशय सुरक्षित पर्याय असल्याचेही श्री. सेठी म्हणाले.

नगरकरांसाठी अभिमानास्पद

राहुरीत शालेय शिक्षण व नगरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या विजय सेठी यांना साहसी क्रीडाप्रकाराची आवड आहे. ‘पॅराग्लायडिंग’, ‘पॅरामोटरिंग’ मध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यातूनच त्यांनी मुंबईच्या साजिद चौगले यांच्यासह सहा महिन्यांपूर्वी नगर येथे ‘पॅरामोटर बेस जंप’ चा, म्हणजे पॅरामोटरमधून जमिनीवर उडी मारण्याचा विक्रम केला.

या क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार भारतात पहिल्यांदाच हा उपक्रम झाला. काही वर्षांपूर्वी उद्योगानिमित्त पुण्यात गेलेल्या श्री. सेठी यांनी ‘मॅक्सलिंक’उद्योगसमूह सुरू केला. विविध देशांमध्ये जाळे असलेला हा उद्योगसमूह उत्पादन, सेवा या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा