अभिमानास्पद! भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं

6 सप्टेंबरला चंद्रावर पोहोचणार; भारताची ऐतिहासिक कामगिरी

श्रीहरिकोटा- जगभरातील सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या आणि अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या ’चांद्रयान-2’ आज अखेर अंतराळात झेपावलं. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ’चांद्रयान-2’ चे प्रक्षेपण करण्यात आले. यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ज्ञांसह देशवासियांनी एकच जल्लोष केला.

हरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून ’बाहुबली’ रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक आले होते. जवळपास 7500 लोकांनी ऑनलाईन बुकिंग केले होते. यासाठी इस्त्रोने 10000 लोक बसू शकतील अशी गॅलरी बनविली होती. दरम्यान, आजच्या यशस्वी उड्डाणानंतर चांद्रयान-2 काही दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणार असून, त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल. तसेच 6 सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्रावर उतरेल.

चांद्रयान 2 ला पृथ्वीच्या कक्षेत पोहोचविण्यासाठी इस्त्रोने शक्तीशाली रॉकेट जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लॉंच व्हेईकल मार्क 3 (जीएसएलव्ही-एमके 3) वापर केला. या रॉकेटला स्थानिक प्रसारमाध्यमांनी ’बाहुबली’ असे नवा दिले आहे. या रॉकेटचे वजन 640 टन असून रॉकेटची किंमत 375 कोटी रुपये आहे. या रॉकेटने 3.8 टन वजनाच्या चांद्रयान-2 या यानाला घेऊन उड्डाण केले. या यानाच्या निर्मितीचा खर्च 6.3 कोटी रुपये आहे. हे यान वेगवेगळे प्रवासाचे टप्पे पार करत 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरणार आहे. आतपर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनीच यान चंद्रावर नेले आहे.

2008 मध्ये भारताने चांद्रयान-1 ही मोहीम आखली होती. हे यान निरीक्षण करणारे होते. या यानाने 10 महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली. चंद्रावर पाणी असल्याचा शोध याच मोहिमेमध्ये लागला होता.

’अशी’ असेल मोहीम

चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करणाचे उद्दिष्ट आहे. चंद्रापासून 30 किलोमीटरवर गेल्यानंतर ’चांद्रयान-2’ ची गती कमी करण्यात येईल. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. हीच शेवटची 15 मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत. भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे.

पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर 3 लाख 84 हजार किलोमीटर इतके आहे. चांद्रयान-2 द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोव्हर ’विक्रम’ उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल. त्यानंतर 6 ते 7 सप्टेंबर दरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे 4 तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. नंतर पुढील 15 मिनिटांच्या आत इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा