यंदा मान्सूनचे पाच दिवस उशिराने होणार आगमन

6 जूनला केरळात धडकणार; भारतीय हवामान विभाग

नवी दिल्ली – यंदा मान्सून सर्वसाधारण वेळेपेक्षा पाच दिवस उशिरा येणार असून, 6 जून रोजी केरळच्या समुद्रकिनार्‍यावर धडकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. अंदमानचा समुद्र, निकोबार बेटं आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होते, असे हवामान विभागाने सांगितले.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा मान्सून भारतात येण्यासाठी उशिर होऊ शकतो. 6 जून रोजी मान्सून केरळच्या समुद्रकिनारी धडक देईल. मागील वर्षी 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता तर 2017 मध्ये 30 मे रोजी मान्सूनने केरळच्या किनार्‍यावर वर्दी दिली होती.

दरवर्षी 7 जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात वर्दी देतो. परंतु यंदा मान्सूनचे प्रवेशद्वार समजले जाणार्‍या केरळमध्येच 6 जूनला आगमन होत असल्याने मान्सून महाराष्ट्रात आणखी उशिराने पोहोचेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे सामान्य जनता आणि बळीराजाला पावसाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अल निनोचा प्रभाव कमी

भारतीय हवामान विभागाने आपल्या पहिल्या अंदाजात सामन्य पावसाची अपेक्षा व्यक्त केली होती. यंदा अल निनोचा जोर कमी असेल आणि तो हळूहळू कमी होईल. यंदा सामान्य म्हणजेच 96 टक्के पावसाचा अंदाज आहे. यात 5 टक्के पाऊस वर खाली होऊ शकतो, असे आयएमडीने म्हटले होते.

यंदा किती पाऊस पडणार?

यंदा मान्सूनदरम्यान सामान्यपेक्षा अतिशय जास्त (110 टक्क्यांपेक्षा जास्त) पावसाची शक्यता 2 टक्के आहे, तर सामान्यपेक्षा जास्त (104-110 टक्के) पावसाची शक्यता 10 टक्के आहे. याशिवाय सामान्य म्हणजेच 96-104 टक्के पावसाची शक्यता 39 टक्के आहे. म्हणजेच एकत्रित सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सामन्यपेक्षा थोडा कमी म्हणजेच 90-96 टक्के पावसाची शक्यता 32 टक्के आणि 90 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता 16 टक्के आहे. मान्सूनदरम्यान जर 90 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला तर दुष्काळ जाहीर होतो.

मान्सूनचे आगमन लांबणार, यंदा कमी पावसाची शक्यता; स्कायमेटचा अंदाज

केरळातील मान्सूनचे आगमन यंदा तीन दिवस उशिराने म्हणजे 4 जून रोजी होण्याची शक्यता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवली आहे. साधारणपणे एक जून रोजी केरळात मान्सून दाखल होतो. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी मंगळवारी मान्सूनचा ताजा अंदाज जाहीर केला. त्यांनी सांगितले, केरळच्या किनार्‍यावर 4 जूनला मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. यात दोन दिवस मागे-पुढे होण्याची शक्यता आहे. सिंह म्हणाले, यंदा मान्सून फारसा चांगला राहणार नाही व पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.

स्कायमेटच्या हवामान अंदाज आणि हवामान बदल विभागाचे प्रमुख निवृत्त एअर व्हाइस मार्शल जी.पी. शर्मा यांनी सांगितले, या वेळी मान्सूनचे केंद्र अरबी समुद्रात राहील, हे चांगले चिन्ह नाही. यामुळे मोसमी वारे वायव्य दिशेला जास्त प्रमाणात सरकून, ते देशाच्या पठारी भागापासून दूर जातील. स्कायमेट आपल्या पहिल्या अंदाजावरच ठाम असून यंदा देशात सरासरीच्या 93 टक्के पाऊस होईल. म्हणजेच, देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.